ठाणे : सिडकोच्या निधीतून व्होल्टास कंपनीच्या जागेवर कोविड रुग्णालय उभारण्याच्या निविदेने कोटीकोटी उड्डाण घेतले आहे. अंदाजे १२ कोटींच्या या रुग्णालयाच्या कामाचे कंत्राट सुमारे २३ कोटींपर्यंत पोहोचले आहे.
विशिष्ट कंत्राटदारावर मेहेरनजर ठेवण्यासाठी राजकीय दबावापोटी नियमांची पायमल्ली झाल्याचा संशय व्यक्त करून या निविदेला स्थगिती देऊन अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांचेही लक्ष वेधले आहे. या रुग्णालयासाठी सिडकोने महापालिकेला १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठीची निविदा ३१ जुलै रोजी वर्तमानपत्रात, तर राज्य सरकारच्या वेबसाइटवर ५ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केली. हेतुपुरस्सर दिरंगाईही केली गेली. यानंतर, अचानक कामाचे नाव बदलून कोविड हॉस्पिटल कन्स्ट्रक्शनऐवजी हॉस्पिटल डेव्हलपमेंट असे केले.
निविदा भरण्यासाठी १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ पर्यंत मुदत होती. मात्र, १३ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अटी व शर्ती बदलल्या. नव्या अटींत कंत्राटदाराला सिव्हील वर्कच्या अनुभवासह निविदा भरण्याची वेळ १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता केली. विशेष म्हणजे अटी व मुदत बदलण्याची जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध केली नाही. सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक निविदेमध्ये प्री-बिड करण्याची अट राज्य सरकारने निश्चित केली आहे. मात्र, या निविदेत ते केलेले नाही, याकडे त्यांनी आयुक्तांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ठामपाने सिडकोकडे १७.७ कोटी अनुदानाची मागणी केली आहे. निविदेच्या अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कोविडकाळात हॉस्पिटल तातडीने उभारणे महत्त्वाचे असल्याने प्री-बिडची अट लागू केलेली नाही. कामात स्पर्धा झालेली आहे. लघुत्तम निविदाकार मे. शायोना कॉर्पोरेशन यांनी सादर केलेला देकार रु. २२.८० कोटींचा असून तो अवाजवी असल्याने त्यांना सुधारित देकार सादर करण्यास सांगितले आहे. दर हे एसएसआरमधून व त्यात नसलेले दर हे बाजारभावानुसार घेतलेले आहेत. त्यांच्या तपासणीसाठी सिडकोकडे सादर केलेले आहे. सर्व बाबींची संबंधित विभागाची तांत्रिक मान्यता व प्रस्तावास आर्थिक मान्यता घेतलेली आहे. निविदा अटीशर्तींचीपूर्तता केवळ दोन निविदाकारांनी केलेली असून त्याची कागदपत्रे त्यांनी सादर केलेली आहेत. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपाकोविड रुग्णालयाच्या स्पर्धेत केवळ दोनच कंत्राटदारसुमारे १२ कोटींवरून २३ कोटींवर पोहोचलेल्या या रुग्णालयासाठी चार कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. मात्र, त्यातील दोन निविदा फेटाळल्या असून आता केवळ दोनच कंत्राटदार अंतिम शर्यतीत आहेत. त्यावरून संबंधित कामासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा झाली नसल्याचे उघड होत आहे. या कामासाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांनी रुग्णालयउभारणी, व्हेंटिलेटरपुरवठा, मेडिकल व आॅक्सिजनपुरवठा, सिव्हील कन्स्ट्रक्शन्स आदींचा अनुभव असलेली प्रमाणपत्रे सादर केली नसल्याचे निविदा वेबसाइटवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना कोणत्या निकषांवर पात्र ठरविण्यात आले, असा सवाल करण्यात येत आहे.ठरावीक कंत्राटदारांवर मेहेरनजर?ठाणे महापालिकेच्या वतीने ठरावीक कंत्राटदारांवर मेहेरनजर टाकण्यात आली असल्याचा संशय आहे. संबंधित इच्छुक ठेकेदाराकडूनच अटी व शर्ती निश्चित केल्या जात असून, राजकीय दबावापोटी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंत्राटदाराचा हुकूम पाळला जात आहे, असा संशय वाघुले यांनी व्यक्त केला आहे. या कंत्राटदाराने यापूर्वीही काही कामे अशाच पद्धतीने केली आहेत का, याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.तांत्रिक व आर्थिक मान्यतेशिवाय कामया कामासाठी सुरुवातीला १२ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले गेले. त्यानंतर, निविदा १४ कोटींची काढण्यात आली. तर, आता प्रत्यक्ष कंत्राटदाराचा देकार सुमारे २२ कोटी ८० लाखांपर्यंत पोहोेचला आहे. या निविदेचे कोट्यवधींचे वाढीव उड्डाण संशयास्पद आहे, असा आक्षेप आहे. साधारणत: महापालिकेचे कोणतेही काम करताना केंद्र व राज्य सरकारने निश्चित केलेले दर गृहीत धरले जातात. मात्र, या रुग्णालयासाठी वैद्यकीय साहित्याबरोबरच वीज, पाणी, सिव्हील वर्कबाबत तांत्रिक व आर्थिक मान्यता घेतली गेली नाही. परिणामी, निविदा १४ कोटींपर्यंत पोहोचली, असा आरोप करून प्रत्यक्षात किमान आठ कोटींमध्ये हे काम पूर्ण होऊ शकले असते, असा दावा त्यांनी केला आहे.