कल्याण : एका कोरोना रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी ब्लड टेस्ट करण्यात आली. रुग्णाच्या ब्लड टेस्टचा रिपोर्ट चुकीचा दिल्याने प्लाझ्मा थेरपीसाठी रुग्णाच्या मुलाला तब्बल ४८ तास वणवण करावी लागली. त्यामुळे रुग्णाला उपचार मिळण्यात विलंब झाला आहे.
कल्याण पूर्वेतील टाटानाका परिसरात राहणारे सुरेंद्र साहू (६०) यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारावर आतापर्यंत दोन लाख खर्च झाला असल्याची माहिती सुरेंद्र यांचा मुलगा सुकेश याने दिली आहे. त्यांच्या वडिलांना प्लाझ्मा थेरपी द्यावी लागेल, असे सांगण्यात आले. रुग्णाची ब्लड टेस्ट हेल्थ केअर या लॅबमध्ये करण्यात आली. ब्लड टेस्टच्या रिपोर्टनुसार रुग्णाचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ असल्याचे सांगण्यात आले. हा रिपोर्ट घेऊन सुकेश हा वडिलांकरिता बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा रक्तदाता शोधत होता. ४८ तास फिरून त्याने रक्तदाता शोधून आणला. मात्र, त्याच्या वडिलांचा रक्तगट हा एबी पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले. त्याने यासंदर्भात त्याच्या वडिलांची ब्लड टेस्ट डोंबिवलीच्या संकल्प लॅबमध्ये केली. या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप रुग्णाचा मुलगा सुकेश याला झाला आहे. तसेच त्यांच्या वडिलांना उपचार मिळण्यात विलंब झाला आहे.आयुक्तांकडे कारवाईची मागणीयाप्रकरणी हेल्थ केअर लॅबचे चालक राकेश शुक्ला यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रिपोर्ट देण्यात काहीतरी चूक झाली आहे. याप्रकरणी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी लॅबचालकास जाब विचारला असून चुकीचा रिपोर्ट देऊन रुग्णांचा जीव घेणार का, असा संतप्त सवाल केला आहे. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात कारवाईची मागणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.