ठाणे : कोरोनाच्या समस्येशी समाजातील सर्व स्तरांवरील सर्वच गट आपापल्या परीने झुंज देण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अतोनात वाढला आहे. अतिताणामुळे येणारा भावनिक थकवा, घर आणि काम यामुळे होणारी ओढाताण, कामावर असताना झेलावी लागणारी रोजची आव्हानांमुळे अनेकांना भावनिक त्रस्ततेचा अनुभव येत आहे. अशा वैद्यकयोद्ध्यांना मनआरोग्य उपचार सेवा देण्यात येणार आहे. दिलासा ही संकल्पना आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थने अंमलात आणले असून, संस्था त्यांच्यासाठी एक अनोखी नि:शुल्क ऑनलाइन सेवा सुरू करणार आहे.
आयपीएचच्या ठाणे, पुणे आणि नाशिक केंद्रांमधले, मनोविकारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ या उपक्रमात सहभागी होत आहेत. सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात ९३२४७५३ ६५७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून, संबंधित डॉक्टर किंवा पॅरामेडिकल व्यावसायिकाला आपले नाव रजिस्टर करता येईल. त्या व्यक्तीची आवश्यक माहिती गुगल-फॉर्मद्वारे घेण्यात येईल तसेच उपक्रमाचे संपूर्ण माहितीपत्रक संबंधित व्यक्तीला पाठविण्यात येईल. त्यानंतर तिला मनआरोग्य व्यावसायिकाशी संवाद साधता येईल. या प्राथमिक भेटीमध्ये पुढचे उपचार आणि पाठपुरावा कसा करावा याची योजना, समस्यात्रस्त व्यक्ती आणि मनआरोग्य उपचारक तयार करतील.
संपूर्ण कोरोनाकाळामध्ये संस्थेचे सर्व कार्यकर्ते, प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही स्वरूपामध्ये रुग्णसेवा देत राहिले आहेत. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य क्षेत्राला उपयुक्त अशा कार्यशाळा सुद्धा ऑनलाइन सुरू आहेत. कसोटीच्या काळामध्ये मनआरोग्याचा हा वसा अजून एका उपक्रमाद्वारे पुढे नेऊन ''सुदृढ मन सर्वांसाठी '' हे ध्येयवाक्य प्रत्यक्षात आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास संस्थेचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केला.
- ही योजना फक्त वैद्यकीय-निमवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठीच आहे.
- उद्यापासून या संकल्पनेचे सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू होणार आहे.
- या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून आपत्कालीन सेवेत कार्यरत असणाऱ्या पोलीस, पत्रकार त्यांच्यापर्यंत भविष्यात ही सेवा नेण्याचा मानस आहे. त्यांना ही सेवा देता आली तर तो सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग ठरेल, असा विश्वास डॉ. नाडकर्णी यांनी व्यक्त केला.
-या ऑनलाइन सेवेचा शुभारंभ १ मे रोजी सकाळी ११ ते १२ यावेळच्या होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे असणार आहेत.