उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाई, डम्पिंग, नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, महापालिका रुग्णालय सुरू करा, आदी विकास कामाबाबत आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. आयुक्तांनी शहर विकास कामाबाबत आश्वासन देऊन रुग्णालय सुरू करण्याचे संकेत दिले.
उल्हासनगरातील अनेक रस्त्याचे कामे अर्धवट असून रस्त्या लगतच्या नाल्याचे कामही ठप्प पडले आहेत. एकूणच शहर विकास कामे, महापालिका रुग्णालय, सिंधू भवन, नाले सफाई, पाणी टंचाई, परिवहन सेवा, वाहतूक कोंडी, एमएमआरडीए रस्ते, भुयारी गटारी, अवैध बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया आदी समस्या बाबत भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी विविध समस्याचे निराकरण महापालिका प्रशासन करणार असल्याचे आश्वासन दिले. भाजपा शिष्टमंडळात आमदार आयलानीसह भाजपा जिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी, लाल पंजाबी, टोनी शीरवानी, होमणारायन वर्मा, डॉ एस बी सिंग आदी जण उपस्थित होते.
महापालिकेने नागरिकांसाठी कोरोना काळात रिजेन्सी अंटेलिया या ठिकाणी २०० बेडचे रुग्णालय उभारले आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्चून रुग्णालयात लागणारे बेड, यंत्रसामुग्री, इतर साहित्य खरेदी केले. असून ऑक्सिजन टॅंक बसविण्यात आले. मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष व राजकीय नेत्यातील आपसातील स्पर्धेमुळे रुग्णालयाच्या उदघाटनाचा दिवस उजाडला नाही. आमदार आयलानी यांच्या मागणीने महापालिका रुग्णालय सुरू होणार असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने रुग्णालय स्वतः चालविण्या ऐवजी खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांच्या सोबत संपर्क साधला असतां रुग्णालय ठेकेदाराद्वारे सुरू करण्याचे संकेत दिले. तसेच शहरवासियावर अल्प दरात व मोफत उपचार होणार असल्याच्या जुईकर म्हणाल्या आहेत.
नर्स व वॉर्डबॉयच्या नोकऱ्या टांगणीला?
महापालिकेने ऐन कोरोना काळात थेट जाहिरात देऊन डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व काही प्रयोगतंत्रज्ञ यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले. स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात घालून त्यांनी हजारो नागरिकांचे जीव वाचविले. अश्या कंत्राटी नर्स, वॉर्डबॉय यांच्या नोकरी धोक्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात त्यांचा करारनामा संपत असल्याने, ठेकेदार यापुढे कामावर ठेवते की नाही?. अशी टांगती तलवार लटली आहे.