ठाणे : ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाऱ्या आरक्षण सोडतीची उद्या (शुक्रवारी) गडकरी रंगायतनमध्ये घोषणा होणार आहे. त्यानंतर २०१७च्या प्रारंभी होणाऱ्या महापालिका निवडणुकीकरिता काहींचे वॉर्ड हे आरक्षित होतील तर काहींचे वॉर्ड आजूबाजूच्या दोनचार वॉर्डात समाविष्ट होऊन लुप्त होतील. त्यामुळे सर्वच नगरसेवकांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे. वॉर्ड महिलांकरिता आरक्षित झाला तर पत्नी, सून किंवा भावजय हिला उमेदवारी मिळवून देण्याची धडपड सुरु होईल. वॉर्ड अनुसूचित जाती-जमातीकरिता आरक्षित झाला तर राजकीय विजनवासात जाणे अपरिहार्य होणार आहे. गेली पाच वर्षे राजकीय विजनवास भोगत असलेल्या काहींना एखाद्या खुल्या किंवा आरक्षित वॉर्डाची लॉटरी लागण्याचीही शक्यता आहे.ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ३३ बहुसदस्यीय प्रभागांमधून तब्बल १३१ नगरसेवक निवडून जाणार असून लोकसंख्या वाढीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दिवा परिसरातून यंदा तीन पॅनलमधून तब्बल ११ नगरसेवक निवडून येणार आहेत. शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जुन्या ठाण्यातून २० नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार आहेत. सर्वच नगरसेवकांचे या सोडतीकडे लक्ष आहे. काहींना प्रभागांची रचना, नवे प्रभाग, अनुसूचित जाती-जमातीची वाढलेली लोकसंख्या याची कल्पना आधीपासूनच आली आहे. सध्या तरी एकच प्रभाग वाढल्याचे दिसते. ठाणे शहर हा युतीचा बालेकिल्ला मानला जातो. नव्या प्रभाग रचनेत कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील जागा वाढल्या असून जुन्या ठाण्यातील कमी झाल्या आहेत. घोडबंदर परिसरातील जागाही वाढल्या आहेत. परंतु कळवा - मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहता, या भागातील फेररचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र आहे. दिव्यातील २९ क्रमांकाचा खर्डी, डवले, पडले गाव, देसाई, खीडकाळी, डायघर, कौसा तलाव हा विरळ लोकसंख्येचा प्रभाग भौगोलिक कारणास्तव तीन नगरसेवकांचा करण्यात आला आहे. एकूण ३३ पॅनलमधील हा एकमेव प्रभाग तीन नगरसेवकांचा असणार आहे. घोडबंदर भागातील नगरसेवकांचे बळ २० होणार असून तेथील नगरसेवकांची संख्या दोनने वाढली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट, कोपरी भागात यंदा नगरसेवकांची संख्या १० ने घटली आहे. नव्या समीकरणानुसार येथून ३२ नगरसेवक निवडून येणार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसला मात्र काहीसा दिलासा मिळाला असून कळव्यातून १६ तर मुंब्र्यातून २० नगरसेवक निवडून येणार असल्याने त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर परिसरातून चार जादा नगरसेवक निवडून येणार असून नव्या रचनेत येथील प्रभागांची संख्या १२ झाली आहे. नौपाडा, पाचपाखाडी, घंटाळी, टेंभी नाका यासारख्या भागातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या घटून १२ झाली आहे. नव्या रचनेत सत्ताधारी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने जागा घटल्याचे चित्र आहे. वागळे इस्टेट भागात सहा नगरसेवक कमी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळवा-मुंब्य्रातील जागा ३६ झाल्या आहेत. तेथे चार नगरसेवक वाढले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यात सर्वाधिक जागा वाढल्या असून दोन जागांवरून तेथील नगरसेवकांचा आकडा थेट ११ पर्यत पोहचला आहे. आरक्षित वॉर्डाची लॉटरी लागणार?अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक असलेले प्रभाग असे - प्रभाग क्र. - ३ (अ) (मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर) प्रभाग क्र. - ६ (अ) (लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, परेरानगर, रामबाग), प्रभाग क्र. ७ (अ) - वर्तनकगर, ग्लॅस्लो कंपनी, रेमंड, समतानगर, ओसवाल पार्क, प्रभाग क्र . ९ (अ) - पारसिकनगर, संघवी हिल्स, आनंद विहार, सह्याद्री, खारेगाव. प्रभाग क्र. १५ (अ) -इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, जय भवानी नगर. प्रभाग क्र . १६ (अ) - श्रीनगर, वारलीपाडा, रामनगर, कैलाशनगर. प्रभाग क्र.- २२ (सेंट्रल जेल, महागिरी, खारकर अळी, चेंदणी कोळीवाडा). प्रभाग क्र. - २४ अ (विटावा, आनंदनगर, भोलानगर). प्रभाग क्र . - २८ अ (आगासन, दातीवली, भोलेनाथ नगर).अनुसुचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेले प्रभाग - प्रभाग क्र. १ अ (ओवळे, कासारवडवली, भार्इंदर पाडा, कावेसर). प्रभाग क्र. २ अ (हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रम्हांड, अकबर कॅम्प) प्रभाग क्र. ५ अ (पवारनगर, वसंत विहार, शिवाईनगर, येऊर)
कुणाकुणाला आज ‘दे धक्का’
By admin | Published: October 07, 2016 5:25 AM