वाडा : भिवंडी लोकसभा मतदार संघातील कुणबी समाज हा कायम कॉग्रेस विचारधारेशी जोडलेला आहे. स्वार्थासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील हे कॉग्रेस पक्ष सोडून विरोधकांना मिळाले असले तरी हा समाज मात्र आपल्या पाठीशी असल्याचे उदगार कॉग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडा येथे झालेल्या सभेत काढले.कॉग्रेस, राष्ट्रवादी शेकाप, बहुजन विकास आघाडी, रिपाई (कवाडे गट) आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारार्थ येथील पटारे मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपण विदयमान खासदार असतांना पक्षाने उमेदवारी नाकारून विश्वनाथ पाटलांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी आपण पक्षांच्या आदेशाप्रमाणे काम केले. मी कुठेही नाराजी व्यक्त केली नाही. या निवडणुकीत मात्र पक्षाने आपली उमेदवारी जाहीर केल्याने विश्वनाथ पाटील नाराज झाले व थेट ज्यांच्या कडून पराभव स्वीकारला त्यांच्या गोटात सामील झाले हे दुदैर्वी आहे. केवळ स्वार्थासाठी विश्वनाथ पाटील भाजप सोबत गेल्याने कुणबी समाजातच प्रचंड नाराजी असून हा समाज या निवडणुकीत आपल्याच सोबत राहील असा विश्वास टावरे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, की विद्यमान खासदार आणि आपल्या कार्यपध्दतीत जमिन अस्मानाचा फरक आहे. माझे कुठलेही जेसीबी, डंपर नाही अथवा मी ठेकेदारी करीत नाही त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या कार्यालयाचे दरवाजे कायम खुले राहतात असे म्हणून त्यांनी खासदार कपिल पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधावर टीका केली.तर आदिवासी विकास महामंडळाने ३९४ कर्मचा-यांची भरती केली असून त्यामध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यातील एकही उमेदवाराला संधी दिली गेली नाही. या भरती प्रकियेत १५० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्यावर केला. त्याचप्रमाणे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांना खावटी कर्ज वाटले नाही. मात्र त्यांच्या नावावर ३६१ कोटी कर्ज माफ केल्याचे दाखवून मोठा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आदिवासी विकास विभागावर भुसारा यांनी करत हे सरकार सर्वसामान्य जनतेला फसवणारे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.>काळे यांचे टीकास्त्रकॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी या निवडणुकीद्वारे गरीबांना ७२ हजार रु पये मदत देणारी न्याय योजना राबवून ख-या अर्थाने सामान्य जनतेचे हित साधले जाणार असल्याचे म्हणाले. नोटा बदलण्यासाठी रांगा लावायला लावून छळणाऱ्या सरकारला मतदानासाठी रांगा लावून धडा शिकवा असे आवाहन कॉग्रेसचे सरचिटणीस गणोरे यांनी केले.
कुणबी समाज हा सदैव काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे- सुरेश टावरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 2:30 AM