मुरबाड : आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवणाऱ्या मुरबाड पंचायत समितीच्या आरोग्य खात्याची बेपर्वाई खुटल गावातील नागरिकांना भोगायला आली असून एकाचवेळी सगळ्या गावाला डेंग्यू, थंडी, तापाने विळखा घातला आहे.
खुटल, बारागाव येथील ग्रामस्थ हरिश्चंद्र पठारे, बाळकृष्ण पठारे, रमाकांत पठारे यांनी सांगितले की, आठ दिवसांपासून खुटल गावातील ग्रामस्थ तापाने बेजार झाले आहेत. हे गाव मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असले, तरी तेथे सुविधा नसल्याने ताप आलेल्या रुग्णांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रक्ततपासणीनंतर बाळकृष्ण पठारे, कमल पठारे, कुंदा पठारे, भालचंद्र पठारे, मंदा दळवी यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. या रुग्णांना मध्यवर्ती रु ग्णालय उल्हासनगर येथे दाखल केले.
मालू दळवी, रमाबाई शिंदे, देवयानी पठारे, उपेक्षा पठारे, गुलाब पठारे, ताई पठारे, रघुनाथ ठाकरे, जतीन ठाकरे, राधिका पठारे, रत्ना पठारे, फसाबाई पठारे, प्रकाश पठारे, निर्मला उंबरे, रमेश उंबरे, उज्ज्वला पठारे, अमोल पठारे, लता पठारे, बाळकृष्ण निमसे आदींना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असल्याने या रुग्णांवर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खुटल गावात उपकेंद्र असून मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समावेश आहे. परंतु, येथील कर्मचाऱ्यांनी किती वेळा गावात जाऊन आरोग्यतपासणी केली. ग्रामपंचायतीने अशा प्रकारची साथ उद््भवू नये म्हणून आजपर्यंत काय उपाययोजना केली, तालुका आरोग्य विभागाचे किती नियंत्रण आहे, हे या घटनेनंतर दिसून आले.
प्रशासनाने वेळीच हालचाल केली नाहीतर परिस्थिती गंभीर होऊ शकते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथील आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना शहरातील रूग्णालयात पाठवले जाते. प्रशासनाने तातडीने गावात स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.
आरोग्य पथक सज्ज
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी सुनील बनसोडे यांनी सांगितले की, खुटल येथे पाच ते सहा रुग्ण डेंग्यूचे आढळले असून काही रुग्ण तापाचे आहेत. या सर्व रुग्णांवर उल्हासनगर व टोकावडे येथे उपचार सुरू आहेत. तसेच आरोग्य पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.