कल्याण : शाळेचे तोंड कधीही न पाहिलेल्या मजूर वस्तीतील सात मुलांवरील अशिक्षित असल्याचा शिक्का आता पुसला जाणार आहे. कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयाने या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिना’निमित्त शनिवारी सम्राट अशोक विद्यालयाने थेट मजुरांच्या वस्तीत जाऊन शाळाबाह्य मुलांना शोधून काढले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार वयानुरूप इयत्तांमध्ये आता त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.करण राठोड, अर्जुन राठोड, महिमा कांबळे, रोशनी जाधव, रेखा राठोड, रोशनी कांबळे अशी या मुलांची नावे आहेत. आईवडील मजुरीच्या कामाला जातात. त्यामुळे घरी लहान भावंडांना सांभाळण्याकरिता मोठा भाऊ अथवा बहीण घरी राहत असत. परिणामी, ही सात मुले शाळेपासून वंचित राहत होती. सरकारस्तरावरून लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघर किंवा इतर सुविधा उपलब्ध केल्या, तर गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
मजुरांची मुले येणार शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 5:23 AM