ठाणे : श्रमजीवी संघटनेत संस्थापक विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांनी घेतलेला निर्णय मान्य करण्याच्या आतापर्यंतच्या परंपरेला जिल्हा परिषद, पंचायतीच्या निवडणुकीत छेद जाण्याची भीती व्यक्त होत असून भाजपाला दिलेल्या पाठिंब्यामुळे अनेक गटा-गणांत कार्यकर्ते वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. श्रमजीवी संघटना सोडायची नाही, पण भाजपासोबतही जायचे नाही अशी भूमिका आदिवासी, ओबीसी कुटुंबांनी घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी राजकीय खेळी करत श्रमजीवी संघटनेसोबत असलेले संबंध कायम ठेवत आदिवासींना वेगळी आश्वासने देण्यास सुरूवात केली आहे.भाजपाला केलेले राजकीय सहकार्य तात्पुरते असल्याचे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपाध्यक्ष आराध्या पंडित यांनी जाहीर केले असले तरी त्यातून शिवसेनेला अपेक्षित झटका मिळण्याची शक्यता कमी असल्याचे श्रमजीवीचे कार्यकर्तेच खाजगीत सांगत आहेत. शिवसेना आणि श्रमजीवी यांच्या कामाची पद्धत, कार्यकर्त्यांचा पिंड एकसारखा आहे. त्यामुळे त्यांना परस्परांशी सहकार्य करणे कठीण गेले नाही. पण भाजपात नेते भरपूर आणि कार्यकर्ते कमी अशी स्थिती आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा नेत्यांनी पाठ फिरवल्याने श्रमजीवींचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. भिवंडी, शहापूर अणि मुरबाडच्या राजकारणात एकगठ्ठा मते मिळावी म्हणून भाजपा नेत्यांनी श्रमजीवीशी सहकार्य केले. पण भिवंडीचा मोजका अपवाद वगळता अजून तरी श्रमजीवीला त्याचा राजकीय लाभ झालेला नाही. अन्य तालुक्यांतील नेते श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे सोडा, गृहीतही धरत नसल्याने शिवसेनेने त्याचा राजकीय लाभ उठवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे श्रमजीवी-भाजपाची युती ही दोन पक्षांची युती न राहता विवेक पंडित यांचे कुटुंब आणि खासदार कपिल पाटील यांच्या कुटुंबाची युती झाली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन होत नसल्याने याचा भाजपाला याचा कितपत राजकीय फायदा होईल, याबाबत अंदाज बांधणे कठीण बनले आहे.भाजपाने आपली सर्व ताकद वापरून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावतंत्राचा वापर करत खासदार कपील पाटील यांनी श्रमजीवी संघटनेला शिवसेनेपासून तोडत भाजपासोबत युती करण्यात यश मिळवले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपाला, त्यातही भिवंडी तालुक्याला मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी भिवंडी वगळता शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण तालुक्यात श्रमजीवीच्या ताकदीवर तेथील भाजपा नेते अवलंबून नसल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांना सोबत घेतलेले नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील कार्यकर्ते वेगळ््या भूमिकेत आहेत.पाटील-पंडित कुटुंबांचा निर्णयश्रमजीवी संघटनेत विवेक पंडित आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शब्द अंतिम मानला जातो, तर भाजपात खासदार कपील पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे सत्तेसाठी या दोन कुटुंबात युती झाल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.आजवर शिवसेनेसोबत काम केल्यानंतर आता अचानक भाजपासोबत जाणे कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे ‘भाऊं’ना विरोध न करता त्या त्या गट किंवा गणाच्या पातळीवर स्थानिक परिस्थिती पाहून कार्यकर्ते निर्णय घेण्याची शक्यता आहे.संघटनेत नाराजी उफाळून येऊ नये म्हणून त्या कार्यकर्त्यांना तसा निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल, अशी चर्चा संघटनेत सुरू आहे.निवडणुकीपुरते सहकार्ययाबाबत भाजपाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही संघटना एकत्र येतील, असे मानणे भाबडेपणाचे असल्याचे मान्य केले. ही एक राजकीय सोय आहे आणि ती खास करून भिवंडी तालुक्यापुरती असल्याचा त्यांचा दावा आहे. श्रमजीवीच्या नेत्यांनीही हा तात्पुरता निर्णय असल्याचे जाहीर केल्याकडे भाजपा नेत्यांनी लक्ष वेधले.ंप्रश्न सोडवण्याचे आश्वासनगेली २५ वर्षे ठाणे जिल्ह्यात गाजणारा आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न सोडवणे, आरोग्य सुविधा, वनजमिनींचा प्रश्न सोडवणे, रोजगार हमीची कामे यासारखे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विवेक पंडित यांना दिल्याने निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपाध्यक्ष आराध्या पंडित यांनी जाहीर केले. विवेक पंडित यांच्या निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेनेला जोर का झटका बसला.शिवसेना-श्रमजीवी एकत्रचभाजपातील नव्या कार्यकर्त्यांशी श्रमजीवींचे संबंध चांगले नाहीत. त्याचवेळी शिवसेनेशी मात्र त्यांचे दीर्घकाळ संबंध असल्याने तात्पुरत्या युतीसाठी ते तोडणे त्यांना कठीण जाते आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाºयांकडून कामे होत असल्याने श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांत आणि त्यांच्यात जवळीकआहे. शिवसेनेच्या संघटनेत एकाच समाजाचे प्राबल्य नसल्याने त्यांचे आणि श्रमजीवीचे कार्यकर्ते परस्परांच्या संघटनेतही सामावलेले आहेत.शिवसेनेत त्वेष : डिवचल्यानंतर त्वेषाने निवडणूक लढवण्याची शिवसेनेची परंपरा या निवडणुकीत दिसून येते आहे. भाजपाची एकाधिकारशाही आणि श्रमजीवी संघटनेला तोडण्याचा केलेला प्रयत्न यामुळे संघटनेतील गट-तट एकत्र आल्याचे चित्र आहे. त्यांनी श्रमजीवीसोबतचे संबंध आहेत तसेच ठेवत प्रचार सुरू केला आहे.
श्रमजीवीत अस्वस्थता , भाजपासोबत जाण्यास विरोध, शिवसेनेच्या आश्वासनांवरच राजकारण अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:54 AM