टिटवाळा : वडवली येथील कोणार्क सॉलिटेअर गृहप्रकल्पातील एका इमारतीच्या १२व्या मजल्यावर काम करणारा एक मजूर खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. मजुरांना सुरक्षिततेचे साहित्य दिले गेले नसल्याने ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रकल्पाचे विकासक आणि बांधकाम कंत्राटदाराविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोणार्क सॉलिटेअर गृहप्रकल्पात १२ मजली इमारती बांधण्यात येत आहेत. त्यातील तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यांचा निवासी वापरही सुरू झाला आहे. याच प्रकल्पातील चौथ्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काही मजूर इमारतीच्या १२व्या मजल्यावर प्लाय काढण्याचे काम करत होते. त्यावेळी अशोक कुमार यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) हा डकमधून खाली जमिनीवर पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बांधकाम कंत्राटदार शरीफ शब्बीर बेग (४६) याने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विरेंद्रकुमार राजनाथराम कुमार या मजुराच्या फिर्यादीवरून बेग व कोणार्क सॉलिटेअरचे बिल्डर अशा दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे करीत आहेत.
-------------