बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील टोक असलेले वांगणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. या भागात अनेक गृहसंकुले उभी राहत असून तेथे राहण्यासाठी आलेले बहुतांश लोक चाकरमानी असल्याने पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करता सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी वांगणीकरांची माफक अपेक्षा आहे. मात्र, वांगणी रेल्वे स्थानकामध्ये सुविधा पुरवण्यात रेल्वे प्रशासनाला रस नसल्याचे दिसते आहे.वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच वांगणीत रेल्वे प्रवाशांच्या समस्याही वाढत आहेत. या स्थानकात मुंबई दिशेला रेल्वेचा पादचारी पूल असला, तरी कर्जत दिशेला मात्र अद्यापही पादचारी पूल नाही. त्यामुळे प्रवाशांना रूळ ओलांडण्याचा धोका पत्करावा लागतो आहे. स्थानिक खा. कपिल पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी लोकसभेत शून्य प्रहरात या रेल्वे पादचारी पुलाचा मुद्दा उपस्थित केला होता. रेल्वेमार्गावर उड्डाणपूल नसल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे. विशेषत: महिला, मुले आणि वृद्धांचे रेल्वेमार्ग ओलांडताना हाल होतात. तर, रेल्वेखाली सापडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या भागात रेल्वेमार्गावर उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे.रेल्वे पादचारी पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी वांगणीत सनराइज सामाजिक संस्थेने स्वाक्षरी मोहीम राबवली होती. शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून या मोहिमेला पाठिंबा दर्शवला. वांगणी रेल्वे स्टेशनवर येजा करण्यासाठी एकही प्रशस्त मार्ग नाही. वांगणी रेल्वे स्टेशनवर केवळ दोनच तिकीट खिडक्या आहेत. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत बसावे लागते. तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्याबरोबरच वांगणीत लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या रेल्वेचे आरक्षण केंद्रही सुरू करण्याची स्थानिकांची मागणी आहे. शिवाय, स्थानकावर बसण्यासाठी पुरेसे बाकडे आणि संपूर्ण स्थानकावर शेड नसल्याने पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रवाशांना पायºयांवर बसावे लागते.गाड्यांची संख्या अपुरी : वांगणीला जाण्यासाठी केवळ कर्जत आणि खोपोलीकडे जाणाºया गाड्यांवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागते. दिवसाला केवळ ३३ गाड्या जाण्यासाठी आणि ३३ गाड्या येण्यासाठी आहेत. मात्र, या गाड्यांमधील अंतरदेखील मोठे असल्याने वांगणीकरांची प्रचंड गैरसोय होत असल्याने या मार्गावर गाड्या वाढवण्याची तसेच वांगणी लोकल सुरू करण्याचीही मागणी आहे. कल्याण-कर्जत शटल सेवा सुरू केल्यास त्याचाही लाभ वांगणीच्या प्रवाशांना होऊ शकतो, असेही ते सांगतात.उड्डाणपुलाअभावी वाहतुकीचा खोळंबा : वांगणीच्या पूर्व-पश्चिम भागात येजा करण्यासाठी उड्डाणपूल नसल्याने वाहनाने पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे गेट ओलांडूनच जावे लागते. रेल्वे स्थानकात रेल्वे येताना व जाताना हे गेट बंद असल्यामुळे वाहनचालकांना खोळंबून राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर वांगणीच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाºया उड्डाणपुलाची उभारणी करण्याची मागणी होत आहे.
वांगणी स्थानकात सोयीसुविधांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 6:16 AM