शेणवा : सरकारच्या राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत घरोघरी स्वच्छतागृह सक्तीचे करण्यात आले असताना मात्र वाशाळा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात स्वच्छतागृहच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. किचन ओटा ,प्रसूतिगृहाचा अभाव, पाणी समस्या, विजेचा लपंडाव, रु ग्णवाहिका नाही अशा विविध समस्यांनी ग्रासले आहे या उपकेंद्राला. या उपकेंद्राची इमारत केव्हा होणार याच्या प्रतीक्षेत कर्मचारी व ग्रामस्थ आहेत.कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असणाऱ्या वाशाळा व ढाकणे उपकेंद्रात वेळुक,टोकरखांड, ढेंगणमाळ, तेलमपाडा ,कोळीपाडा,पाटोल,सुसरवाडी, थरयाचापाडा, वाघवाडी,धूपरवाडी,गावंडवाडी,चिंद्याचीवाडी, पिंगलवाडी, फुगाळा,कोथला,पाटीलवाडी,कलभोंडा,लादेवाडी,उंबरवाडी,आघानवाडी अशा जवळपास दहा हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असणार्या विविध आदिवासी गावपाडयाचा समावेश आहे. सहा हजार दोनशे नऊ लोकसंख्या असणाऱ्या वाशाळा उपकेंद्रातंर्गत पाच गावे व १३ पाडे असून बहुतांश आदिवासी समाजाची वस्ती आहे. येथे १५ जिल्हा परिषद शाळा, १ आश्रम शाळा, ९ अंगणवाडया, ३ मिनी अंगणवाड्या आहेत. तसेच १० आशा कामगार,११ पाडा स्वयंसेवक,१५ प्रशिक्षित दाई कार्यरत आहेत.आदिवासी मागास समाजाला आरोग्य सेवा देता याव्यात या उद्देशाने सरकारने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ५ ते ६ किलोमीटर अंतरावर डोंगरात हे उपकेंद्र उभारले आहेत. मात्र वाशाळा उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी ,आरोग्य सेवक,सेविका, कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २००९-१०मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत दुरुस्ती केलेल्या ढाकणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच आरोग्य सेविका कार्यरत आहे. (वार्ताहर)
वाशाळा आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव
By admin | Published: May 04, 2017 5:46 AM