लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणेकरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू होती; परंतु आता टेमघर येथे पाच नवीन पंप बसवून त्या माध्यमातून ठाणेकरांना वाढीव १०० दशलक्ष पाणी मिळणार आहे. यामुळे ठाण्यातील सर्वच भागांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असा दावा केला आहे; परंतु पंप आले असले तरी त्यांच्या ठेकेदाराचे कामाचे देयक अद्यापही महापालिकेने दिलेले नाही. यामुळे जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत काम न करण्याचा इशाराच ठेकेदाराने दिला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बरी नसल्याने सध्या ठेकेदारांची बिले थकली आहेत.
टेमघर येथे आलेल्या पाच पंपांची पाहणी नुकतीच स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी केली होती. त्यानंतर ते बसविण्याचे काम लवकरच सुरू करून ठाणेकरांना अधिकचे पाणी मिळेल, असा दावा त्यांनी केला होता; परंतु या वाढीव पाण्याच्या मार्गात आता निधीचा अडसर उभा ठाकला आहे. ठाणे महापालिकेने हे पंप खाजगी ठेकेदाराकडून मागविले आहेत. या पंपासह इतर कामांचा खर्च हा साधारणपणो १६ कोटींच्या वर जाणारा आहे; परंतु यातील थोडीसुद्धा रक्कम संबंधित ठेकेदाराला अद्यापही दिलेली नाही.
महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदाराने पंप आणले आहेत; परंतु आता किमान थोडी तरी रक्कम मिळाली तरच काम सुरू करेन, असे त्याने सांगितले आहे. शिवाय त्याच्या इतर कामांचीदेखील देयके त्याला अद्याप मिळालेली नाहीत. यामुळे बिल मिळत नाही तोपर्यंत काम करणार नसल्याचे त्याने कळविल्याचेही सूत्रे म्हणाली. कोरोनामुळे सध्या पालिकेची परिस्थिती बेताची असून, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ठाणेकरांना हे वाढीव पाणी केव्हा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
कामे बंद करण्याचा ठेकेदारांचा इशारा
मागील १५ दिवसांपूर्वी ठेकेदारांनी बिले मिळावीत या मागणीसाठी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी याच ठेकेदारांनी पुन्हा महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अल्टिमेटम दिला आहे. बिले अदा केली नाहीत, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामे बंद करू, असा इशारा दिला आहे.
स्थानिक ठेकेदारांत नाराजी
ठाण्यातील ठेकेदारांची एक प्रकारे साखळी आहे; परंतु ती मोडीत काढून बाहेरील ठेकेदाराने ठाण्यात मागील काही वर्षांत जम बसविला आहे. जी कामे वाढीव दराने करता येऊ शकतात, तीच तो कमी दराने करून देत आहे; परंतु यावरून स्थानिक ठेकेदारांची डोकेदुखी वाढली आहे. त्या ठेकेदाराकडून कामाचा दर्जा राखला जात नसल्याचे स्थानिक ठेकेदारांचे म्हणणे आहे. असे असताना नंतर पुन्हा त्या कामासाठी वाढीव निधी खर्च होत आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराचा बंदोबस्त करण्याची मागणी या ठेकेदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.