ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात लक्षणे असलेले रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना तत्काळ बरे करण्यासाठी सध्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर अधिक वाढला आहे. परंतु, मागील काही दिवसापासून ठाण्यात त्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब समोर आली. महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांना देखील याचा साठा अपुरा पडू लागल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे रुग्णांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक सैरावैरा धावत असून हे इंजेक्शन मिळविण्यासाठी कसरत करीत आहेत. ज्यांच्याकडे ते उपलब्ध होत आहे, त्याठिकाणी त्याची किंमत तिप्पट मोजावी लागत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या ८८ हजार ९०८ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ७४ हजार ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत १३ हजार ४८३ रुग्णांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ४८० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस आता मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तर अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी रेमडेसिवीर हे महत्त्वाचे आधार ठरत आहे. परंतु, त्याचाच आता तुटवडा जाणवू लागला आहे.
विशेष म्हणजे लक्षणे असलेल्या रुग्णांवर आता लवकर उपचार मिळावेत आणि त्यांना लवकर घरी जाता यावे या उद्देशाने रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. मागील आठवड्यापर्यंत रुग्णालयातील मेडिकलमध्ये सहज हे इंजेक्शन उपलब्ध होत होते. परंतु, आता या आठवड्यापासून त्याचा साठा अपुरा पडू लागला आहे. रुग्णालयातीलच डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना ते उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करू लागले आहेत. यापूर्वी हे इंजेक्शन ८९९ रुपयांना एक मिळत होते. परंतु, आता त्याचीच किंमत २१०० ते २५०० हजार रुपयांच्या घरात गेली आहे. त्यातही एवढे इंजेक्शन महाग कसे असा सवाल केला असता, बाजारात उपलब्ध नसल्याचे सांगून ते बाहेरून मागवावे लागत असल्याने त्याची किंमत वाढत असल्याचे मेडिकल चालक किंवा ज्यांच्याकडे ते उपलब्ध आहे, त्यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या खिशाला देखील यामुळे जास्तीची कात्री लागत आहे. त्यातही महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातही मागील दोन दिवस हे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नसल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे येथील रुग्णांना ते बाहेरून मागविण्यासाठी सांगितले जात आहे.
रेमडेसिवीरचा काळा बाजार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले आहेत. परंतु ,असे असताना ही लूट सुरूच असल्याचे दिसत आहे. एकूणच रुग्णांची संख्या वाढत असताना या इंजेक्शनचा पुरवठा वाढविणे गरजेचे असताना ही ते वाढत नसल्याने त्याचा काळा बाजार आता सुरू झाला आहे. परंतु, आपल्या रुग्णाचे प्राण वाचावेत या उद्देशाने रुग्णाचे नातेवाईक देखील हे महागडे इंजेक्शन विकत घेताना दिसत आहे. त्यामुळे यावर कुठेतरी अंकुश लावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.