कल्याण : कचोरे परिसरातील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीमधील दवाखान्याची जीर्ण अवस्थेमुळे पडझड झाली आहे. परिणामी, जागेअभावी फेबु्रवारी २०१९ पासून शेजारच्या शाळेलगतच्या सभागृहात कुष्ठरुग्णांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही वापराविना खितपत पडलेली आणि जीर्ण झालेली वास्तू आजही जैसे थे धोकादायक अवस्थेत उभी आहे. ती तोडणे आवश्यक असताना त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. या वास्तूलगतच स्थानिकांचा येण्या-जाण्याचा रस्ता असल्याने एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.वसाहतीत कुष्ठरुग्णांची १६० कुटुंबे वास्तव्याला आहेत. येथील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या येथील १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या रुग्णांमध्ये दिव्यांगाचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे अशांना दररोज मलमपट्टी करावी लागते, अन्यथा रुग्णांच्या जखमांमधून बाहेर पडणाऱ्या जंतंूमुळे रोगाचा फैलाव होऊ शकतो.कुष्ठरुग्णांची वाढती संख्या पाहता केडीएमसीने १९९३ मध्ये येथे एक स्वतंत्र दवाखाना उभारला. गेली २५ वर्षे तेथे रुग्णांवर उपचार सुरू होते. परंतु, त्या दवाखान्याची जीर्ण अवस्थेमुळे पुरती पडझड झाली आहे. अतिधोकादायक अवस्थेतील या दवाखान्याचा कधीही स्लॅब कोसळून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना दुखापत होऊ शकते. त्यामुळे फेब्रुवारी २०१९ पासून हा दवाखाना शेजारच्या केडीएमसीच्या राजगुरू विद्यालयालगतच्या सभागृहात हलविण्यात आला आहे. तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी या परिसराचा दौरा केला होता. त्यावेळी नगरसेविका रेखा चौधरी यांनी दवाखान्याच्या अवस्थेकडे आयुक्तांचे लक्ष वेधले होते. यानंतर त्याच परिसरात नवीन दवाखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. चौधरी यांच्याच पुढाकाराने त्या कामाचे भुमिपूजन महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ३० जानेवारी २०२० ला करण्यात आले. महापालिकेच्या अर्थसंकल्पात याकामासाठी ६० लाखांची तरतूद आहे. परंतु, अद्याप नव्या बांधकामाचीही एक वीट रचली गेलेली नाही. त्यामुळे दवाखान्याअभावी आजही शाळेलगतच्या सभागृहातच कुष्ठरुग्णांवर उपचार केले जात आहेत.बांधकाम लवकरात लवकर तोडण्याची मागणीजुन्या जीर्ण दवाखान्याची वास्तूही धोकादायक अवस्थेत उभी असल्याने एखादा भाग कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या दवाखान्याच्या बाजूलाच घरे आणि दुकाने आहेत.त्यामुळे तेथे नागरिकांची ये-जा सुरू असते. एप्रिलमध्ये बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली होती. परंतु, पूर्णपणे बांधकाम तोडलेले नाही. त्यामुळे ते लवकरात लवकर तोडून नवीन दवाखाना उभारावा, अशी मागणी कुष्ठपीडितांकडूनहोत आहे.
दुरुस्तीअभावी दवाखान्याची धोकादायक वास्तू जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:42 AM