नितिन पंडीत
भिवंडी ( दि. 10 ) काेराेना काळात असंख्य खाजगी उद्योग व्यवसाय बंद पडल्याने लाखाे हातांचा रोजगार हिरावून गेला असतानाच ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळांमधीलशिक्षकांना सुद्धा वेतन मिळत नसल्याने या खासगी शिक्षकांना बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच कुटुंबियांचे पालनपोषण करायचे कसे अशा आर्थिक विवंचनेत हे खासगी शाळांमधील शिक्षक सापडले असून त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी भावना भिवंडी येथील एका खासगी शाळेतल्या शिक्षकाने व्यक्त केली आहे.
लॉकडाऊन काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवून घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देत आहेत. त्यानंतर शासन निर्णयानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. शासकीय व अनुदानित शिक्षकांना वेळेवर मासिक वेतन, प्रवास भत्ता व वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत आहेत परंतु हेच काम करणारे खाजगी शाळांमधील शिक्षक या सर्वांपासून वंचित असून, ऑनलाइन शिक्षण सुरू झाले परंतु खाजगी शाळांची मागील व चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे खाजगी शाळा व्यवस्थापन चिंतीत आहेत .खाजगी शाळांची फी भरण्यास पालक असमर्थता दाखवीत असल्याने
विद्यार्थी फि मिळत नसल्याने खासगी शाळेतील शिक्षकांचे वेतन देखील संस्थाचालक देत नाही त्यामुळे या शिक्षकांवर आर्थिकसंक्त ओढवले असून अशा परिस्थितीत खाजगी शाळांमधील शिक्षक वेतन न मिळाल्यामुळे हवालदील झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण, घराचे वाहनांचे कर्ज हप्ते, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय गरजा या भागवायच्या कशा या विवंचनेत खाजगी शाळांमधील शिक्षक भरडले जात आहेत. या परिस्थितीत शासन आम्हाला न्याय देणार की नाही असा प्रश्न भिवंडी येथील खाजगी शाळेमधील शिक्षकांनी उपस्थित केला आहे.