ठाणे : मतांसाठी शिक्षकांना आमिषे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांनी पत्रकार परिषदेत केला. दारूपार्ट्या, जेवणावळीची कूपन, गिफ्टचे वाटप सुरू असून हे कशाचे द्योतक आहे, असा प्रश्न त्यांनी केला.विधान परिषदेची एक जागा वाढावी म्हणून राजकीय पक्ष या निवडणुकीत प्रथमच थेटपणे उतरले असून ते गैर असल्याची टीकाही त्यांनी केली. शैक्षणिक धोरणांवरून त्यांनी भाजपालाही लक्ष्य केले.राज्याच्या शिक्षण खात्याकडून शिक्षक अथवा शाळांबाबत घेतले जाणारे निर्णय चुकीचे असून माझी लढाई सरकारविरोधात त्यांनी सांगितले. शिक्षकांचे अनुदान, मान्यता, समायोजनासह इतरही प्रश्न सुटू शकलेले नाहीत. सध्याचे शासन ते प्रश्न सोडवू शकणार नसल्याचा आरोप त्यांनी केला.मी पूर्वी भाजपाच्या बाजूने होतो. परंतु, आता शिक्षणाच्या प्रश्नावर सरकार काहीही करत नसल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांचे प्रश्न न सोडविता शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप यांनी पक्ष म्हणून या निवडणुकीत उडी घेतली आहे. असे पक्षीय राजकारण आजवर कधीही झाले नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.केवळ विधिमंडळातील जागा वाढवण्यासाठीचा हा अट्टहास असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील १७ आमदार, तीन खासदार आणि ३ मंत्री सध्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरून प्रचार करत आहेत, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला. विविध राजकीय पक्ष आपल्या वृत्तीतून शिक्षकांची प्रतिमा मलीन करत आहेत. सध्या अनेक ठिकाणी शाळांच्या ठिकाणी पार्ट्या रंगत आहेत. जेवणावळीचे कूपन दिले जात आहेत. गिफ्टचे वाटप सुरू आहे, शिक्षकांना आमिष दाखवण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)
मतांसाठी शिक्षकांना आमिषे
By admin | Published: February 02, 2017 3:11 AM