कल्याण : एक हजार लोकांच्या मागे पाच सफाई कामगार हवेत हे प्रमाण लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील १५ लाख लोकसंख्येकरिता सात हजार ५०० सफाई कामगार हवे आहेत. प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात एक हजार ८६६ सफाई स्वच्छतेचे काम करीत आहेत. तात्पर्य, महापालिकेस आणखीन पाच हजार ५०० सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सफाई कामगारांची भरती करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी धूळ खात पडला आहे.महापालिका हद्दीत १५ लाख लोकसंख्या आहे. शहरात ६५० मेट्रीक टन कचरा गोळा होता. हा कचरा उचलणे, झाडणे, तो कचरा कुंडीत गोळा करणे ही कामे महापालिकेच्या सफाई कामगारांकडून केली जातात. शहर स्वच्छतेची मदार या कामगारावर असते. महापालिकेच्या सफाई खात्यात एक हजार ८६६ कामगार कार्यरत आहेत. संख्या कमी असल्याने या कामगारांवर कामाचा ताण पडत आहे. शहरातील स्वच्छेतेचे अनेकवेळा वाभाडे निघाले आहेत. शहर स्वच्छतेच्या सर्वेक्षणात महापालिकेचा क्रमांक अजून बराच खाली आहे.महापालिकेने एकूण दहा प्रभाग क्षेत्रापैकी चार प्रभाग क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम खाजगी कंत्राटदार कंपनी आर अॅण्ड डी यांना दिले आहे. या कंपनीच्या कामाविषयी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीकडून योग्य प्रकारे काम केले जात नाही. तसेच कचऱ्याचे खाजगीकरण झालेल्या प्रभागातील सफाई कामगार अन्य प्रभागात वर्ग करण्यात आलेले नाहीत. अन्य सहा प्रभाग क्षेत्र कार्यालयात स्वच्छतेचे काम सफाई कामगारांकडूनच केले जात आहे. महापालिकेच्या हद्दीत लोकसंख्येनुसार सात हजार ५०० सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या उपलब्ध सफाई कामगारांकडून पुरेशा क्षमतेने काम करुन घेता येत नाही. त्यांना दोन शिफ्टमध्ये काम दिले जाते. मात्र कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण जास्त असल्याने सगळ््याच कामगारांचा सफाईकरिता उपयोग होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून दोन हजार ५०० सफाई कामगारांची भरती केली जावी, असा प्रस्ताव तयार करुन तो राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर सरकारने विचार केलेला नाही. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या घनकचरा विभागाने ३८० कामगार कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने विरोध केला होता. त्याच्या विरोधात ‘झाडू आंदोलन’ व ‘काम बंद’ आंदोलनही केले होते. त्यानंतरही सरकारने सफाई कामगारांची भरती केलेली नाही.पावसामुळे स्वच्छतेवर पडतोय ताणसतत पडणाºया पावसात महापालिकेच्या सफाई कामगारांवर कचरा उचलण्याचा व स्वच्छतेचा ताण आहे. असे असतानाही महापालिकेने कुठेही कचरा साचू दिला नाही. अन्यथा पावसाळ््यात साथीचे रोग झपाट्याने पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे वेळीच कचरा उचलण्यावर भर दिल्याचा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास शहरात शून्य कचरा मोहीम राबवणे शक्य होऊ शकते, याकडे घनकचरा व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे.
केडीएमसीत साडेपाच हजार जणांची कमतरता : भरतीचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळखात पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 1:07 AM