ठाणे- येथील श्रीनगर पोलीस ठाण्यातील महिला कक्षातच अनिता भीमराव व्हावळ (३४, रा. ठाणे ) या महिला पोलीस नाईकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कौटूंबिक कारणामुळे तिने स्वत:ची आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीमध्ये समोर आल्याचे सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.
महिला पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या अनिता या २००८ मध्ये ठाणे शहर पोलीस दलामध्ये भरती झाल्या होत्या. १६ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणो त्या सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाल्या होत्या. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी फोनवरुन संपर्क साधत होत्या. मात्र, त्यांनी फोनच घेतला नाही. त्यामुळे या महिला कर्मचाऱ्याने महिला कक्षात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा या महिला कक्षातच अनिता वाव्हाळ यांनी ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्यांच्या मागे पती आणि दोन मुली असा परिवार आहे.
दरम्यान, ज्या पोलीस ठाण्यात त्या कार्यरत होत्या, त्याच श्रीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची वेळ पोलिसांवर ओढवली. याप्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांनी सांगितले. ‘प्राथमिक तपासात तरी कौटुंबिक कलहातून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. परंतू, हेच कारण आहे की, अन्य काही अशा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे,’ असे ठाणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी सांगिले.