उल्हासनगर :भाजप व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या परिवहन समिती सभापतीपदी आघाडीचे दिनेश लाहरानी विजयी झाले. भाजप पुरस्कृत शंकर दावानी व आघाडीचे लाहरानी यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून सभापतीपदी लाहरानी यांची निवड करण्यात आली.
उल्हासनगर महापालिकेत भाजप बहुमतात असताना महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या लीलाबाई अशान महापौरपदी, तर उपमहापौरपदी रिपाइंचे भगवान भालेराव विजयी झाले. तोच पाढा परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गिरविण्याची शक्यता व्यक्त होत होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. समितीत एकूण १२ सदस्य असून दावानी व लाहरानी यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. अखेर, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते चिठ्ठी काढून सभापतीपदी लाहरानी यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी बोरीकर यांनी जाहीर केले.
च्लाहरानी यांची परिवहन समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यावर महाविकास आघाडीने जल्लोष केला. लाहरानी ओमी टीमच्या व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. महापालिकेची परिवहनसेवा गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प असताना परिवहन समिती सभापती व सदस्यांची निवडणूक होत आहे.
च्परिवहनसेवा सुरू नसताना सभापती व सदस्यांवर लाखोंचा खर्च का, असा प्रश्नही शहरातून विचारला जात आहे. तर, लवकरच परिवहनसेवा सुरू करण्याचा मानस लाहरानी यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अंदाजपत्रकात बसखरेदीसाठी विशेष तरतूद केली होती.