बिर्लागेट : म्हारळ गावातील आंबेडकरनगरातील लक्ष्मी चाळीवर दरड कोसळून १६ जुलैला मनुष्यहानी झाली होती. त्यानंतर, ‘लोकमत’ने ‘...म्हारळचे होईल माळीण’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची गंभीर दखल घेत म्हारळ ग्रामपंचायतीने गुरुवारी लक्ष्मीनगर चाळीवर हातोडा चालवत तेथील १२ खोल्या जमीनदोस्त केल्या.म्हारळमधील लक्ष्मी चाळीवर दरड व घरांचे बांधकाम कोसळले होते. त्यात मोहम्मद शेख आणि सैफुद्दीन खान हे दोघे ठार, तर पाच जण जखमी झाले होते. कल्याणचे तहसीलदार अमित सानप व गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी त्याची दखल घेत तेथील बेकायदा बांधकाम तत्काळ तोडण्याचे आदेश ग्रामसेवक उदय शेळके यांना दिले होते. त्यानुसार, शेळके यांनी ४५ नागरिकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी लक्ष्मीनगर चाळीवर ग्रामपंचायतीच्या १३ कर्मचाºयांनी गुरुवारी कारवाई केली. त्यात १२ खोल्या तोडण्यात आल्या. उर्वरित १०-१२ खोल्या तोडण्याचे काम सुरू आहे. उर्वरित बांधकामे पावसाने उघडीप घेतल्यानंतर तोडली जाणार असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.दरम्यान, चाळीचे बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दिनेश म्हस्के व राजू म्हस्के यांच्याविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चाळीतील रहिवाशांची तात्पुरती निवासाची व्यवस्था केल्याचे उत्तम म्हस्के यांनी सांगितले.
लक्ष्मी चाळीतील १२ खोल्या पाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:56 AM