अजित मांडकेठाणे : एकीकडे ठाणे महापालिका वृक्षलागवडीचा डंका वाजवत असताना दुसरीकडे तलाव परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेले वृक्ष पाण्याअभावी मृत झाले असल्याची बाब समोर आली आहे. ठाण्याची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाºया मासुंदा तलावाचे पाच वर्षांपूर्वी तीन कोटींचा निधी खर्च करून सुशोभीकरण केले होते. त्यानंतर, पुन्हा या तलावासाठी वारंवार कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. परंतु, आजही तो असुविधांच्या गर्तेत अडकल्याचे वास्तव पुन्हा समोर आले.संपूर्ण तलाव परिसरात पसरलेली दुर्गंधी, घोड्यांच्या विष्ठेचा दुर्गंध, प्रेमीयुगुलांचा गराडा, फेरीवाले आणि टांगेवाल्यांसाठी तर तो जणू आंदण दिला की काय, असे चित्र सध्या दिसत आहे. उंदीर, घुशींनी तलावाची अक्षरश: वाट लावली आहे. आता तर या ठिकाणी तरंगता पाथ वे तयार करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु, येथील मूळ समस्या मात्र जैसे थे असून त्या सुटणार कधी, असा सवाल मात्र कायम आहे.मासुंद्याचे सुशोभीकरण २००९ मध्ये केले होते. यामध्ये तलावाचा कठडा बांधणे, नागरिकांना बसण्यासाठी बाकडे तयार करणे, विद्युत रोषणाई, चार जॉगिंग ट्रॅक, वृक्षलागवड, कृत्रिम घाट, कारंजे, गेट आणि तलावातील पाण्याचे बायोमेट्रीक पद्धतीने शुद्धीकरण तसेच बाहेरहून येणाºया पाण्यावर फिल्टरेशनचा प्लान तयार करणे आदी कामे केल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु, त्यातील कारंजे, बाकडे आणि इतर काही किरकोळ कामे वगळता बाकी कामे झाली आहेत, हा संशोधनाचा भाग आहे. तलावाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर १३ कारंजी उभारण्यात आली. परंतु, पाच वर्षे उलटून गेल्यावर आजही ती बंद असून त्यांचे सात व्हॉल्व्ह गायब झाले आहेत. त्यांचा लखलखाट पाहावयास मिळावा, म्हणून रंगीबेरंगी लाइट्स लावण्यात येणार होते. त्यासाठी केबलही टाकल्या. परंतु, त्या चोरीला गेल्या आहेत. येथील डीपी उघडा असून शॉक लागण्याची शक्यता आहे. केवळ ठेकेदाराशी देखभाल दुुरुस्तीचा करार न केल्याने हे दुरुस्तीचे काम रखडल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु,तलाव शेजारी असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी लावलेली झाडे सुकली आहेत. त्यांना पाणी देण्यासाठी बसवलेला पंप चार महिन्यांपासून नादुरुस्त आहे.७० च्या दशकात सेंट जॉन स्कूल आणि कौपिनेश्वर मंदिरामधील रस्त्यात एक मोठा भराव टाकून नवा स्टेशन रस्ता आणि रंगायतनसाठीची जागा तयार होत असतानाच ठाण्याची पहिली चौपाटी नगर परिषदेने येथे साकारली. वर्दळ वाढल्यावर ठाणेकरांना फेरफटका मारण्यास त्रास होत असल्याने २००९ मध्ये मासुंदा तलावाचा परिसर हा टांग्यापासून मोकळा झाला होता. २०१० मध्ये नोटिफिकेशनप्रमाणे भरगर्दीच्या शहरांमधून सर्वच प्रकारच्या प्राण्यांच्या संचाराला बंदीचा नियम झाला आणि चौपाटीवरील शोकेस घोडागाड्याही अनेक ठिकाणी नव्या चौपाट्या विकसित करून तिकडे पिटाळल्या. त्या वागळे, साकेत, कोलशेत येथे गेल्या. मात्र, हा प्रयत्न सपशेल फसला. नव्या जागांमध्ये एकही टांगा दिसत नसून मासुंदा चौपाटी मात्र ऐनगर्दीच्या ठिकाणीच टांगेवाल्यांनी गिळली आहे. सध्या घोड्यांच्या लीदेचा चौपाटीवर वास येत असून नौकानयन आणि पाळीव मासेमारीचाही फज्जा उडाला आहे.फेरीवाल्यांचा उच्छाद - मासुंदा तलावाच्या एका बाजूला टांगेवाले आपले ठाण मांडून बसलेले दिसतात, तर दुसºया बाजूला संध्याकाळ झाली की, फेरीवाल्यांचा विळखा दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या विळख्यात मासुंद्याचे सौंदर्य झाकले जात आहे.मासुंदा तलावाचा आँखादेखा बेहाल/बालदिन विशेष-७बॅण्ड स्टॅण्डचा स्वर हरपला : सायंकाळी वर्दळ असलेल्या तलावपाळी येथे नागरिकांसाठी बॅण्डचे स्वर साधारणपणे एक वर्षापूर्वी ऐकायला मिळाले आणि शेकडो नागरिकांनी महापालिकेला धन्यवाद दिले. परंतु, काही दिवसच ते स्वर कानी पडले. आता ते गायबच झाले आहेत.सुशोभीकरणाचा प्रस्ताव कगदावरच-राज्य सरोवरसंवर्धन योजनेंतर्गत या तलावाचे सुशोभीकरण केले जाणार होते. यासाठी ४३ लाख ४० हजारांचा खर्च केला जाणार आहे. केवळ महिनाभरात ते करून लेझर शो सुरू केला जाणार होता. त्याच्या जोडीला म्युझिकल फाउंटन, एलईडी लाइट, साउंड सिस्टीम आणि त्याच्या बाजूलाच अॅम्पी थिएटर उभारले जाणार आहे. ६० बाय ३० मीटरच्या आकारात हा लेझर शो आकार घेणार असूून त्याची उंची १६ मीटर असणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारला जाणार असून संबंधित ठेकेदाराला हा प्रकल्प १५ वर्षांसाठी चालवण्यासाठी दिला जाणार होता. या कालावधीत निगा, देखभालीची जबाबदारीदेखील त्याचीच राहणार आहे. त्यानुसार, या ठिकाणी फ्लोटिंग आयलॅण्ड, फूडकोर्ट, कारंजे, चिल्ड्रन झोन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, जलशुद्धीकरण करणे, विसर्जन घाट नूतनीकरण, वर्मी कम्पोस्टिंग पीट, निर्माल्यकलश आदींसह मासेमारी आणि बोटिंगकरिता बीओटी तत्त्वावर या तलावाचे सुशोभीकरण केले जाणार होते. परंतु, त्याचे पुढे काय झाले, खर्च गेला कुठे, याचा थांगपत्ताच पालिकेला नाही.आता नव्याने पुन्हा त्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेने मंजूर केला आहे. यामध्ये सुशोभीकरणासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परंतु, यापुढेही जाऊन येथील कोंडी लक्षात घेऊन येथे तरंगता पाथ वे तयार करण्याचा पालिकेचा मानस आहे. परंतु, हा प्रयोग कितपत शक्य आहे, हे आता येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. सध्या चार ठिकाणी नव्याने बोटीवरील कारंजे बसवण्याचे काम मात्र येथे युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, मूलभूत समस्या सुटल्या तर बरे होईल, अशी माफक अपेक्षा येथे विरंगुळ्यासाठी येणाºया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तलाव तसा चांगला, पण सुविधांअभावी वेशीला टांगला : मासुंद्यातील झाडांनी मृत्यूला कवटाळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:01 AM