ठाणे : मोबाईलसाठी व्हीआयपी क्रमांक देण्याच्या नावाखाली वर्तकनगर भागातील दिनेश कल्याणी यांच्याकडून एक लाख रुपये उकळणा-या पूर्वेश दोषी, अनिल गोसालिया आणि विशाल गोस्वामी या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.या तिघांनीही कल्याणी यांना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोन करून आपण ऐअरटेल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. सुरुवातीला त्यांच्यापैकी एकाने राज सिंग असे नाव सांगून तुम्हाला मोबाईलसाठी व्हीआयपी क्रमांक दिला जाईल, अशी बतावणी करून एक लाख चार हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात संबंधित व्हीआयपी क्रमांक यापूर्वीच मध्यप्रदेशातील एका व्यक्तिला देण्यात आल्याचे समजले. आपली फसवणूक करून या रकमेचा अपहार केल्याबाबतचा अर्ज दिनेश कल्याणी यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केला होता. याच तक्रारीबाबत २५ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला होता. ही फसवणूक करणा-यांची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना मिळाली होती. तिच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. अहिरराव, हवालदार सुभाष मोरे, एस. आर. जाधव यांच्या पथकाने २६ डिसेंबर रोजी वरील तिघांनाही घोडबंदर रोड परिसरातून अटक केली. त्यांच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिलने ग्राहकांना फोन केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे पैसे पूर्वेशच्या बँक खात्यात टाकण्यास सांगितले जायचे. त्यापोटी त्याला १० टक्के रक्कम मिळायची. उर्वरित रक्कम उर्वरित चौघेजण वाटून घ्यायचे,असेही चौकशीत उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्हीआयपी मोबाइल क्रमांक देण्याच्या नावाखाली लाखांची फसवणूक: ठाण्यात तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 9:50 PM