ठाणे : चहा पावडरपाठोपाठ आता नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंब्य्रात छापा टाकून पावणेसात लाखांचा साठा जप्त केला आहे. नूडल्स व खाद्यरंग यांचे नुमने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.शीळफाटा, जकातनाक्यामागे असलेल्या मे. किंग चाऊ या कंपनीत अस्वच्छ वातावरणात नूडल्स करून त्यांची एक किलो आणि ५ ते १० किलो विनालेबल पॅकेटमध्ये पॅकिंग करून हॉटेल आणि चायनीज गाड्यांवर विक्री केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार, ठाणे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, अरविंद कांदळकर, अरविंद खडके, निलेश विशे यांनी सहआयुक्त (कोकण विभाग) शिवाजी देसाई आणि सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ७ मार्च रोजी मुंब्य्रातील कंपनीवर छापा टाकला. त्यावेळी तेथे अस्वच्छ वातावरणासह विनालेबल पॉलिथिन पिशव्यांमध्ये नूडल्सची पॅकिंग करून त्याची विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यावेळी नूडल्स (कलर्ड) या अन्नपदार्थाचा उर्वरित साठा चार हजार पाच पॅकेट्स (४००५ किलो) त्याची किंमत पाच लाख ८० हजार ७२५ व नूडल्स या अन्नपदार्थाचा साठा ६४८ पॅकेट्स (६४८ किलो) त्याची किंमत ९३,९६० असा सहा लाख ७४ हजार ६८५ रुपयांचा साठा कलम २३, २६ व २७ चा भंग होत असल्याने जप्त केला आहे. या छाप्यात ज्या त्रुटी निदर्शनास आल्या, त्या सुधारण्यास कंपनीला सांगितले असून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल असल्याने दंडात्मक किंवा त्याप्रकरणी खटला दाखल करायचा, हे निश्चित करता येईल, असे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी सांगितले.
मुंब्य्रातून पावणेसात लाखांच्या नूडल्स जप्त; एफडीएसची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:01 AM