मीरारोड - कोरोना संसर्गामुळे पालिकेचे उत्पन्न नसल्याने तिजोरीत ठणठणाट असताना दुसरीकडे उपमहापौरांचे दालन आलिशान करण्यासाठी मात्र लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. या आधी आयुक्त, महापौर आदींसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची दालने कोट्यावधी रुपये खर्चून आलिशान केली गेली आहेत. मीरा भाईंदर महापालिका कर्जबाजारी असली तरी नगरसेवक - अधिकारी यांच्यासाठी मात्र करदात्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी मात्र जोरात सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरल्याने पालिकेचे उत्पन्नच ठप्प झाले आहे. त्यामुळे नगरसेवक-अधिकाऱ्यांना आतातरी सुबुद्धी सुचून जनतेच्या पैशाचा वापर काटकसरीने आणि अत्यावश्यक कामांसाठीच केला जाईल अशी अपेक्षा होती. परंतु महापालिकेत उपमहापौर हसमुख गेहलोत यांचे दालन आलिशान करण्याचे कामासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत असताना नाही कोणी अवाक्षर काढण्यास तयार नाहीत. वास्तविक डिम्पल मेहता महापौर असताना त्यांच्या दालनांसह अन्य दालने पूर्णपणे नव्याने आलिशान करण्यासाठी काही कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले आहे .
वास्तविक आधीची दालने चांगली होती व त्यात किरकोळ दुरुस्ती शक्य असताना देखील कोट्यवधी रुपयांचा खर्च केवळ दालने आलिशान करण्यासाठी केला जात आहे अशी टीका जागरूक नागरिकांनी सातत्याने चालवली आहे. परंतु सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी आणि अधिकारी मात्र आलिशान दालने आणि त्यासाठी करदात्या जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी आसुसलेले आहेत. त्यांना साधे कार्यालय नको आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली बिकट आर्थिक परिस्थिती पाहून तरी उपमहापौर हसमुख गेहलोत हे स्वतःचे दालन आलिशान करण्यासाठी लाखो रुपयांच्या खर्चास विरोध करतील आणि दालन साधे व कमी खर्चात केले जाईल असे अपेक्षित होते. पण जनतेचा पैसा आहे म्हणून वाट्टेल तसा उधळायचा हे संतापजनक आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जंगम म्हणाले.
उपमहापौर हसमुख गेहलोत म्हणाले कि, मी पालिकेतील उपमहापौर दालनाच्या सुशोभिकरण काम हे पूर्वीचे मंजूर झालेले होते. परंतु मी स्वतः फर्निचर, रोषणाई, खुर्च्या आदी अनेक कामाच्या खर्चात कपात केली आहे. जेवढा खर्च कमी करता येईल त्याचा प्रयत्न करत आहे. पालिका कनिष्ठ अभियंता अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की उपमहापौर दालन सुशोभिकरणचे काम पूर्वी मंजूर खर्चानुसार सुरू आहे. त्यामुळे खर्चात कपात झालेली नसली तरी वरिष्ठांचे मार्गदर्शन वा आदेश आले तर त्याप्रमाणे काम केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र
"कोरोनाच्या काळात मोदी सरकारचा 'खयाली पुलाव', संकटातील 'संधी'", राहुल गांधींचा हल्लाबोल
CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य
"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"