ठाणे - धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लाखो ठाणेकरांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग अखेरीस खुला झाला असून क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी तब्बल दीड दशकांचा प्रदीर्घ लढा देणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समक्ष बुधवारी या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे ठाण्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
धोकादायक इमारती कोसळून निष्पाप जिवांचे नाहक बळी जाण्याचे प्रकार ठाण्यात वारंवार घडत होते. लक्षावधी नागरिक जीव मुठीत धरून या धोकादायक इमारतींमध्ये राहातात. त्यांना हक्काचे सुरक्षित घर मिळावे, यासाठी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या शिवसेनेने प्रदीर्घ लढा दिला. शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळात धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा वारंवार उपस्थित करून ठाण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्याची मागणी केली होती. विधिमंडळाचे कामकाज अनेकदा बंद पाडले, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेराव घातला, प्रसंगी निलंबनही पत्करले. ठाणे ते विधिमंडळ असा ठाणेकरांचा भव्य मोर्चा काढला, ज्यात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झाले होते.
या प्रदीर्घ लढ्यानंतर २०१४ साली विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन आघाडी सरकारने ठाण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर केली; परंतु त्या योजनेत अनेक त्रुटी असल्यामुळे श्री. शिंदे यांनी पालकमंत्री झाल्यानंतर या त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या माध्यमातून सोशल इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल सादर केला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर राज्य सरकारने ठाण्यासाठी सुधारित क्लस्टर योजनेची अधिसूचना जारी केली.
त्यानुसार ठाण्यासाठी आता क्लस्टर योजनेचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी पालकमंत्री शिंदे यांच्यासमोर केले. याप्रसंगी महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, उपमहापौर रमाकांत मढवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
क्लस्टर योजनेमुळे धोकादायक इमारतीतील लाखो रहिवाशांना स्वतःच्या हक्काचे आणि सुरक्षित घरकुल मिळणार आहे, त्याचप्रमाणे ठाणे शहराची नव्याने आखणी करण्याची संधी आपल्यासमोर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा या माध्यमातून ठाणेकरांना उपलब्ध करून देण्यात येतील आणि ठाण्याच्या सौंदर्यात आणखी भर पडेल, असे शिंदे याप्रसंगी म्हणाले. देशातील पुनर्विकासाचा हा सर्वात मोठा ब्राउनफिल्ड प्रकल्प असणार आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
सदर क्लस्टरमुळे शहरातील ग्रीन झोन्स, अमिनिटी यात वाढ होणार असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशस्त रस्ते देखील उपलब्ध होणार आहेत. तसेच, अतिक्रमणे झालेल्या तलावांनाही मोकळा श्वास घेता येणार आहे. त्यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.