मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या नाकर्तेपणा मुळे महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराला कडून सतत बंदच असल्याने उत्तन वासियांचे प्रचंड हाल होत आहेत. अखेर येथील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एसटी महामंडळाची लालपरी धावून आली आहे . आज रविवार पासून भाईंदर - उत्तन अशी बससेवा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुनं ते सोनं असे म्हणत उत्तन वासियांनी या पुढे पालिका बस ने नाही तर एसटीने प्रवास करणार असा निर्धार बोलून दाखवला .
कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती . परंतु ठेकेदाराला पैसे दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार नाही म्हणून भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक बंद केला होता. त्या नंतर नागरिकांसाठी सुरु झालेली उत्तन मार्गावरील बससेवा ८ सप्टेंबर रोजी भाजपा प्रणित संघटनेने पुन्हा बंद पाडली . या आधी देखील अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार झाले . ठेकेदाराने बस सेवा दिली नाही तर राष्ट्रीय कामगार व श्रमजीवी या दुसऱ्या संघटनांचे कर्मचारी बस चालवण्यास तयार असताना पालिकेने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली .
बस सेवा बंद पडल्याने मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चौक भागातील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत होते . त्यांना नाईलाजाने ५० ते ६० रुपये एकावेळचे रिक्षाभाडे देऊन भाईंदरला यावे लागायचे . जायला सुद्धा तेवढेच भाडे वसूल केले जायचे . त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक तसेच आमदार प्रताप सरनाईक ह्यांना बस सेवा मिळवून देण्याची मागणी केली होती .
आ .सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून परिवहन ठेकेदार, भाजपा प्रणित संघटने मुळे नागरिकांचे चाललेले हाल सांगितले व एसटी बस सुरु करण्याची विनंती केली . परिवहनमंत्री परब ह्यांनी भाईंदर - उत्तन मार्गावर एसटी बससेवा सुरु करण्याचे मान्य करत तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले . त्या अनुषंगाने आज रविवार पासून उत्तन साठी एसटी बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
एसटी बसचे येथील नागरिकांसह प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे . पूर्वी या भागात एसटी बसचीच सेवा चालायची . परंतु पालिकेची बस आल्याने एसटी बंद केली गेली . मात्र पालिकेच्या बससेवेचा नेहमीचा आडमुठेपणा पाहता नागरिक संतप्त आहेत . त्यांनी तर एमबीएमटी चे फुलफॉर्मच मेरे भरोसे मत ठेहरो असे करून टाकले आहे . या आधी देखील पालिका बस संपा मुळे बंद पाडली असता विचारे ह्यांनी एसटी बस सुरु करून दिली होती . आता मात्र पालिकेच्या नव्हे तर एसटी बसनेच प्रवास करा , जुनं ते सोनं असे आवाहन प्रवासी व अन्य संघटना आदीं कडून नागरिकांना केले गेले आहे .