ठाणे : बोली भाषेचा जन्मच मुळात संस्कृतीच्या मातीतून होतो. म्हणूनच या भाषेत गोडवा असतो. बोली भाषा ही त्या-त्या भागाचे प्रतिनिधीत्व करीत असते. आजच्या डिजीटल युगात तिचा संचय करणे ही काळाची गरज असल्याचा सूर बोली भाषेतील साहित्य या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये उमटला.मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे मंगळवारी संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित या परिसंवादामध्ये आनंद बोंद्रे, मोहन पाटील आणि अरविंद दोडे यांनी सहभाग घेतला. सर्वेश तरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तर अशोक बागवे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. बोंद्रे यांनी कोकणी, पाटील यांनी वारली तर दोडे यांनी अहिरणी भाषेची वैशिष्ट्ये यावेळी सांगितली. बोली भाषा हीच खरी मातृभाषा असते. आपण सर्वप्रथम ती आईच्या तोंडून शिकतो. तोतऱ्या भाषेत आई मुलाला बोलायला शिकवते तेव्हा शब्दकोषातले प्रमाण शब्द वापरत नाही. कुत्र्याला कुत्रा किंवा श्वान म्हणण्याऐवजी ती भू-भू म्हणते. चिमणीला चिऊताई, कावळ्याला काऊ तर मांजरीला मनीम्याऊ म्हणते. हे शब्द प्रमाण नसले तरी ऐकायला, बोलायला चांगले वाटतात. आईकडून शिकली जाणारी ही भाषा म्हणजेच मायबोली. कवियत्री बहिणाबाई कोणत्याही विद्यापिठात शिकायला गेल्या नव्हत्या. पण त्यांच्या कविता आजही सर्वांना आवडतात. प्रत्येक भागातील बोली भाषेचे वेगळे वैशिष्ट्य असते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात वारली भाषा वापरली जाते. या भाषेचा निसर्गाशी जास्त संबंध दिसून येतो. प्रत्येक बोलीभाषेचा लहेजा वेगळा असतो. उच्चारांचे सुलभीकरण या बोलीभाषांमधून केले जाते. धर्मेंद्रला बऱ्याच बोली भाषांमध्ये धरमेंदर तर द्रौपदीला दुरपदा म्हणतात. नाशिकच्या पुढे थेट बऱ्हाणपूरपर्यंत अहिराणी भाषेचा प्रभाव दिसतो. गुरं-ढोरं पाळणारी राजस्थानातील अभिर नावाने ओळखली जाणारी मंडळी खानदेशात आली तेव्हा त्यांना अहिर म्हटले जायचे. त्यांच्या बोली भाषेतून अहिरणीचा जन्म झाला. अहिराणी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असली तरी ती तेवढी प्रसिद्ध झाली नाही. या भाषेच्या बहिणाबाई या पहिल्या आणि शेवटच्या नावाजलेल्या कवियत्री होत. बोली भाषांची ही श्रीमंती प्रत्येक भागानुरूप बदलत जाते. मोहन पाटील यांनी स्वच्छता अभियानावर आधारित मजेशीर लघुसंवाद वारली भाषेत सादर केला. अशोक बागवे यांनी सर्व बोलीभाषांचा वापर करून कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)
बोलीभाषेचा जन्म संस्कृतीच्या मातीतून
By admin | Published: January 12, 2017 7:15 AM