---------------------------------
कारचालकावर गुन्हा
कल्याण : एका अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहाड येथे राहणाऱ्या सई राज चौधरी या मुंबईहून शहाडला टॅक्सीने १४ जुलैला रात्री येत होत्या. कारचालक गतिरोधकावरूनही जोरात गाडी चालवित होता. त्याला कार हळू चालविण्याची समज देऊनही त्याने ऐकले नाही. पूर्वेतील तिसगाव नाका प्रसादम हॉटेलसमोरील गतिरोधकावरूनही चालकाने गाडी जोरात नेल्याने गाडीच्या छताचे हूड सई यांच्या डोक्याला लागले आणि कमरेला जोरदार धक्का बसून मार लागला. याप्रकरणी सई यांनी कारचालकाविरोधात तक्रार दिली.
----------------------------------
दुचाकी चोरीला
डोंबिवली: पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात राहणारे तुकाराम भगत यांनी त्यांची मोटारसायकल ते राहत असलेल्या महादेव स्मृती परिसरात पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
--------------------------------------
उघड्या दरवाजावाटे चोरी
कल्याण: अशोक ठाकूर हे जोशी बाग परिसरात राहतात. रविवारी मध्यरात्री ते राहत असलेल्या रॉयल अपार्टमेंटमधील त्यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने १० हजार रूपयांची सोन्याची माळ लंपास केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------
लसीकरण आज नाही
कल्याण: राज्य सरकारकडून लसींचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्व लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहील अशी माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
---------------------------------------
कारच्या धडकेत पादचारी जखमी
डोंबिवली: भरधाव कारची धडक बसल्याने अनुजा वालावलकर या जखमी झाल्या. त्याच कारची एका रिक्षालाही धडक बसली. याप्रकरणी कारचालक विनोद सपकाळ याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता सोनारपाडा परिसरात घडली.
-------------------------------------------
भाजीवाल्यांना छत्रीचे वाटप
डोंबिवली: गेले दोन दिवस शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. भाजी विक्रेते पावसात भिजत भाजी विकत आहेत. आनंदनगर-गांधीनगर परिसरात हे चित्र निदर्शनास येताच डोंबिवली मनविसेचे अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी संबंधित फळ, फूल आणि भाजी विक्रेत्यांना मोठ्या छत्रींचे मोफत वाटप केले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते शशिकांत कोकाटे, संजय सरमळकर आणि प्रमोद शिंदे उपस्थित होते.
--------------------------------------------