ठाणे : नियमांचे उल्लंघन करुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाईचा बडगा उगारला. कोपरी चेकनाक्यावर नवघर पोलिसांनी सकाळपासूनच सुरु केलेल्या कारवाईमुळे तब्बल दोन, अडिच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुचाकीवर डबलसिट प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कारमध्ये केवळ तीन लोकांनाच प्रवास करण्याची अनुमती आहे. मात्र अडिच महिन्यांच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडलेले नागरिक आता बाहेर सर्वकाही आलबेल असल्यासारखेच वागत आहेत. अशा वाहनधारकांवर सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांचे फोटो घेऊन, वाहतूक पोलीस त्यांचा तपशील नोंदवून घेत होते. या सर्वांवर रितसर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे काही वाहनधारक पोलिसांशी वाद घालत होते. त्यामुळे अनेकांची वाहने पोलिसांनी जप्त केली.
पोलिसांच्या कारवाईमुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन, रुग्णवाहिकाही अडकून पडल्या. याशिवाय, सर्व नियमांचे पालन करून खरोखर महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांचाही यामुळे खोळंबा झाला. मात्र सर्व कागदपत्रे असलेल्या नागरिकांना, रुग्णांना, गरोदर महिला तसेच अन्य गरजुंना पोलिसांनी लगेचच जाऊ दिले. सोमवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरुच होती. नवघर पोलिसांच्या कारवाईमुळे ठाणे पोलिसांनाही दुपारी जाग आली. त्यानंतर कोपरी पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीत कारवाईला सुरुवात केली.दहिसर ते वरसावे नाका ‘जॅम’मीरा रोड : मुंबई पोलिसांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी सकाळपासून दहिसर चेकनाका येथे मुंबईत प्रवेश करणाºया वाहनांबाबत काटेकोर तपासणीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे चेकनाका ते वरसावे नाक्यापर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागून वाहतूककोंडी झाली होती. रस्त्यावर असलेल्या वाहनांची संख्या पाहून कोरोनाची भीती किंवा लॉकडाऊ न नक्की आहे का, असा प्रश्न पडला.
शासनाने काही बंधने आणि अटीशर्ती ठेवून १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये दुचाकीवर एकच, तर चारचाकी वाहनात तीन जणांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरण्यास मनाई कायम आहे. मात्र, १ जूनपासून मुंबईत जाणाºया वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून नियमांचेही सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे या बेशिस्त आणि बेजबाबदार लोकांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा कंबर कसली असून मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर येथे सोमवारी सकाळपासूनच मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली. परवानगीपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.नाकाबंदीमुळे पेणकरपाडा, एमआयडीसी व काशिमीरा नाका येथून मुंबईकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीने जॅम झाले होते. तपासणीनंतरच वाहन पुढे सरकत असल्यामुळे काही तास लोक अडकून पडले होते. सोशल मीडियावरही दहिसर नाका जॅम झाला असून पोलीस कारवाई करत असल्याने तिकडे जाऊ नका, असे संदेश फिरत होते. पोलीस तपासणीच्या धास्तीने अनेक वाहनचालकांनी पळ काढला.