डोंबिवली - रिझर्व बँकेने सीकेपी को-ऑप. बँकेचा परवाना रद्द केल्याने ही बँक अवसायनात गेली होती. सीकेपी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि बचत खात्यातील खातेदारांचे पेसे, 'ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ' DICGC यांनी परत देण्यास सुरवात केली आहे. यामुळे डोंबिवलीतील केळकर रोडवरील सीकेपी बँकेच्या शाखेसमोर गेल्या काही दिवसांपासून खातेदारांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.
लवकरच खातेदारांना जास्तीजास्त पाच लाखापर्यंतची रक्कम DICGCकडून मिळणार आहे. गेल्या काही वर्षापासून या बँकेवर रिझर्व बँकेने आर्थिक निर्बंध घातले होते. बँक परत पुनर्जीवित व्हावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले होते. काहींनी तर आपल्या आयुष्याची कमाई या बँकेत ठेवली होती. यात वरिष्ठ नागरिक बहुसंख्येने आहेत. DICGCच्या नियमानुसार अशा प्रकरणात जास्तीजास्त पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कमच परत मिळते. यामुळे ज्या ग्राहकांनी याहून अधिक रक्कम या बँकेत ठेवली होती, त्यांचे नुकसान होणार आहे. याशिवाय बँकेच्या शेअर होल्डरांची रक्कमही मिळण्याची शक्यता कमी आहे.
सीकेपी बँक कृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात खातेदारांतर्फे एक याचिका दाखल करण्यात आली आहे. DICGC यांनी प्रत्येक खातेदाराला पोस्टाने अर्ज पाठविले होते. ते अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 30/01/2021 पर्यंत बँकेत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, आता खादेधारकांची गैरसोय निर्माण होऊ नये, म्हणून ही तारीख वाढवण्यात आली आहे. बँकेचे खातेदार हे अर्ज देण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. या बँकेच्या मुंबई परिसरात एकूण आठ शाखा होत्या.