ठाणे- पालिका प्रशासनाने छटपूजा (Chhatpuja) साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. मात्र प्रशासनाच्या या आवाहनाला फाटा देत ठाण्यातील तलाव परिसरात छटपूजे निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
छटपूजेनिमित्त तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत असते. तलावाची दुरवस्था होत असते. यासाठी अगोदरच पालिकेने नागरिकांना छट पूजा साध्या पद्धतीने साजरी करण्याचे व कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मात्र दुसरीकडे तलाव परिसरात अनेक भाविका कोरोना नियम पायदळी तुडवत बिना मास्क एकत्र जमले होते. ठाण्यातील उपवन तलाव परिसरात असणाऱ्या रायलादेवी तलावात छटपूजे निमित्त अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी राज्याचे नगर विकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनीही या तलावाला भेट देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच येत्या काळात या तलावाचे सुशोभीकरण करणार असल्याचे सांगितले. तसेच छटपूजेसाठी एक भव्य तलावदेखील बांधणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.