डोंबिवली - मुंबईतील लोकलसेवेतील सुधारणांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या 51 हजार कोटींपैकी मोठा निधी कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर मार्गावर वापरला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पिय़ूष गोयल यांच्या आदेशानुसार मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रविवारी कल्याण ते कसारा दरम्यानच्या स्थानकांची पाहणी केली.त्या संदर्भात पाटील यांनी ही माहिती सोमवारी दिली.
कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमान्यांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाढत्या प्रवाशीसंख्येमुळे प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या पट्ट्यातील रेल्वे स्थानकांवर सुविधांसाठी जादा निधी देण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी रविवारी स्थानकांचा दौरा केला. त्यावेळी वासिंद रेल्वे स्थानकावर भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी भेट घेतली. तसेच रेल्वे स्थानकांतील प्रश्नांकडे लक्ष वेधले.
रेल्वे अर्थसंकल्पात 51 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबतचा सविस्तर तपशील अद्यापी पोचलेला नाही. तो आल्यानंतर कामांना सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली. आजच्या पाहणी दौऱ्यात काही स्थानकांवर समस्या आढळल्या. त्याबाबत लगेचच उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कल्याण-कसारा आणि कल्याण-कसारा पट्ट्यातील प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे केवळ लोकलसाठी जादा दोन मार्गांची गरज होती. या बाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली.