मीरारोड - मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. त्यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत शहर स्वच्छ व प्लास्टिक मुक्त ठेवण्याचे आवाहन केले. मीरारोडच्या कनकिया येथील आयुक्त निवास ते रामदेव पार्क, भाईंदरच्या मॅक्सस मॉल ते उड्डाणपूल, हनुमान मंदिर नवघर नाका ते विमल डेअरी, शहीद कौस्तुभ राणे स्मारक ते रसाज सिनेमागृह ते एस के स्टोन अश्या विविध भागातून जागृती करणाऱ्या रॅली काढण्यात आल्या. रॅलीत सर्व सहभागी नंतर रामदेव पार्क येथील पालिकेच्या बुद्धविहार येथे पोहचले.
त्याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री प्रिया मराठे सह अनेक माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये वस्तिस्तर संघ, महिला बचत गट, महिलांच्या सेवाभावी संस्था इत्यादींचा सहभाग होता. स्वच्छते बाबत जनजागृती साठी जादूचे खेळ, स्वच्छता गीत व नृत्य, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते . , स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कार्यरत इंटर्नसचा तसेच रॅली मध्ये सहभागी झालेल्या महिला बचत गट व संस्थांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्लास्टिक वापर विरोधात पथनाट्य सादर करण्यात आले. उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.