ठाणे : ईडीच्या कार्यालयात शरद पवार हे शुक्रवारी स्वत: हजर राहणार असल्याने ठाण्यातून हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत दाखल होणार होते. परंतु, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेसवेवर पोलिसांनी सकाळपासूनच नाकाबंदी केल्याने शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. माजिवडा ते आनंदनगर चेकनाका हे अंतर कापण्यासाठी एरव्ही १0 मिनिटे लागतात, पण कोंडीमुळे तब्बल तीन तासांचा अवधी लागला. स्कूलबस, अॅम्ब्युलन्स आदींसह सकाळीच कामाला निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला. पोलिसांच्या या आततायीपणामुळे विद्यार्थी आणि रुग्ण भरडले गेले. सर्वच मार्गांवर लांबचलांब रांगा लागल्याने ध्वनी, वायुप्रदूषणात वाढ झाली होती.पवारांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणांहून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याने शहराच्या विविध भागांत नाकाबंदी केली होती. त्यामुळे राष्टÑवादीचे पदाधिकाऱ्यांसोबतर् सामान्य वाहनचालकही भरडले गेले. ठाण्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार, हे पोलिसांना आधीच समजले होते. त्यामुळे विटाव्याच्या दिशेने, मुलुंड, खारेगाव, मुंब्रा आणि मुंबईच्या वेशीवर म्हणजेच आनंदनगर चेकनाक्यासह शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सकाळपासूनच नाकाबंदी केली होती. आनंदनगर चेकनाक्याजवळही नाकाबंदी केल्याने वाहनांच्या रांगा थेट घोडबंदरपर्यंत आणि तिकडे मुंबई-नाशिक हायवेच्या दिशेने लागल्या होत्या. प्रत्येक गाडी तपासूनच सोडल्याने सामान्यांचे हाल झाले. पारसिक टोलनाक्याजवळही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्कूलबस, अॅम्ब्युलन्सही अडकून पडल्या होत्या. काही वाहनचालकांनी किमान या वाहनांना तरी सोडावे, अशी मागणी पोलिसांना केली. मात्र, त्यांनी नकारघंटा वाजवल्याचा आरोप यावेळी वाहनचालकांनी केला.दुपारनंतर वाहतूक सुरळीतमुंबईच्या दिशेने जाणारा ईस्टर्न एक्स्प्रेस वे जॅम झाल्याने त्याचा फटका शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही दिसून आला. कळवा, कॅसल मिल, कोर्टनाका, जांभळीनाका, खोपट आदींसह इतर महत्त्वाच्या भागातही वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. दुपारनंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
पोलिसांमुळे मोठी वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:16 AM