ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीचे उप करनिरिक्षकाचा कोरोनाशी सुरु असलेला २० दिवसांचा लढा अखेर अपयशी ठरला आहे. शनिवारी या योध्याने अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे आजच त्याच्या महापालिकेतील नोकरीचा शेवटचा दिवस होता. परंतु याच दिवशी मृत्युने त्यांच्यावर घाला घातला. परंतु पालिकेच्या निष्काळजीपणाचा तोही बळी ठरल्याचे आता पुन्हा एकदा समोर आले आहे. ५५ वर्षे वयावरील व्यक्तींना कोरोना संबधींत कोणत्याही ड्युटी लावू नये असे असतांनाही त्यांना भाईंदरपाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु हृदय विकाराच्या धक्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कार्यरत असलेले उप करनिरिक्षक हे मागील ११ मे रोजी कोरोनामुळे घोडबंदर भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर कोरोनाशी लढा देत असतांना मागाली काही दिवस ते आयसीयुमध्ये व्हेटींलेटरवर होते. त्यातच शनिवारी त्यांचा मृत्यु झाला. परंतु त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या धक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पालिकेने वर्तविला आहे. दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यातून ते दोघेही बरे झाले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या लढाईत उप करनिरिक्षकाची हार झाली.दरम्यान रविवारी त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. परंतु रविवारी सुटटी असल्याने शनिवार हाच त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. याच दिवशी त्यांच्या आयुष्याचाही असा दुर्देवी शेवट झाल्याने महापालिकेत हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मागील सलग दोन वर्षे त्यांनी कर वसुलीत उच्चांक गाठला होता. मागील आर्थिक वर्षात त्यांनी १०८ टक्के वसुली केली होती. यंदाही त्यांनी १०२ टक्के वसुली केली होती. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक सर्व स्तरातून झाले होते.
सेवा निवृत्तीच्या यादीतही होते त्यांचे नावमहापालिकेच्या सेवेतून रविवारी ६४ कर्मचारी, अधिकारी, सफाई कामगार सेवा निवृत्त होणार होते. त्या यादीतही या उप करनिरिक्षकांचे नाव २१ व्या क्रमांकावर होते. परंतु अशा पध्दतीने त्यांच्या आयुष्याचा शेवट होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या चुकीचा दुसरा बळीशासनाने ५५ वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्याना कोव्हीडची कोणतीही कामे देऊ नयेत असे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेमार्फतही तशा प्रकारचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु ते कागदावरच असल्याचे दिसून आले आहेत. यापूर्वी देखील मागील महिन्यात शहर विकास विभागातील एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. त्याला कोरोनाग्रस्त भागाचा सर्व्हेचे काम देण्यात आले होते. तो देखील दोन दिवसांनी सेवेतून निवृत्त होणार होता. परंतु त्याचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता नोकरीच्या शेवटच्या दिवशी आणखी एक दुर्देवी मृत्यु झाला आहे. या उप करनिरिक्षकाला देखील भार्इंदर पाडा येथील क्वारन्टाइन सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. एकूणच शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी केली आहे. तसेच कोरोनामुळे ते ज्या रुग्णालयात दाखल होते, त्या रुग्णालयाने त्यांना पाच दिवसात घरी का सोडले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. घरी सोडतांना त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली होती का? असा प्रश्नही त्यांनी केला असून त्या रुग्णालयावरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.