लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने भरावभूमी प्रकल्पाचे काम प्रस्तावित असताना दुसरीकडे या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केडीएमसी क्षेत्रात १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यातील डोंबिवली आयरेगाव परिसरातील प्रक ल्पाचे काम पूर्णत्वाला आल्याने हा प्रकल्प जूनमध्ये सुरू केला जाणार आहे. तर राजूनगर आणि उंबर्डे येथील बायोगॅस प्रकल्पांची कामेही अंतिम टप्प्यात असल्याने हे प्रकल्पही लवकरच सुरू केले जाणार आहेत. केडीएमसीच्या हद्दीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कार्यवाहीला वेग आलेला नाही. आधारवाडी डम्पिंग बंद करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी याला होत असलेला विलंब लोकप्रतिनिधींच्या रोषाला कारणीभूत ठरला आहे. शहर स्वच्छतेत कल्याण डोंबिवलीचा क्रमांक घसरल्याने महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले होते. सभापती रमेश म्हात्रे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. स्थायी केवळ प्रकल्प मंजूर करते, परंतु ठोस कार्यवाही दिसून येत नाही. त्यामुळे मंजुरी दिलेल्या सहा बायोगॅस प्रकल्पांची कामे मार्गी लावा त्यानंतर अन्य कामांना मंजुरी दिली जाईल असा पवित्राही म्हात्रे यांनी घेतला. दरम्यान, सहा प्रकल्प उभारणीची कामे सुरू असून यातील तीन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. यातील एकाचे काम पूर्ण झाले आहे. १० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या आयरे येथील बायोगॅस प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला आले असून जूनमध्ये तो सुरू केला जाईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.
बायोगॅस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Published: May 27, 2017 2:09 AM