ठाणे : चंद्र-पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने २६ मे रोजी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन होणार असून ते सर्वांना साध्या डोळ्यांनी दिसणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मी.वर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्याजवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मी.अंतरावर येणार आहे. त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २६ मे रोजी सायं. ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल. यानंतर पुढच्यावर्षी सन २०२२ मध्ये १४ जून व १३ जुलै रोजी सुपरमून स्थिती होणार आहे, परंतु ते दिवस पावसाळ्याचे असल्याने दर्शन होणे कदाचित कठीण जाणार आहे. २०२३ मध्ये सुपरमून दिसणार नाही. २०२४ मध्ये १८ सप्टेंबर व १० ऑक्टोबर, सन २०२५ मध्ये ५ नोव्हेंबर व ४ डिसेंबर आणि २०२६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सुपरमून दर्शन होणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.