डोंबिवली : मध्य रेल्वेची लोकल सेवा जी रुळावरून घसरली आहे ती पूर्ववत होण्याचे नावच घेत नाही. एकही दिवस असा नाही की लोकल वेळेत धावत होत्या. पूर्वी लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याची प्रवाशांना नंतर सवयही झाली. मात्र, आज परिस्थिती आहे की, लोकल २० ते २५ मिनिटे कायम उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदारांना बसत आहे. मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. यामुळे प्रवास सुसह्य होईल असे वाटत होते. मात्र, प्रवास असह्य होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले.
कार्यवाही करणार की बोळवणच? अंबरनाथमधील एका प्रवाशाने एकीचे बळ दाखवले आहे. नव्या वेळापत्रकानुसार अंबरनाथहून सकाळी आठ वाजून १० मिनिटांनी सुटणारी लोकल दररोज २५ मिनिटे उशिराने धावते. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनुप मेहेत्रे यांनी या त्रासाविरोधात लढण्यासाठी प्रवाशांना हाक दिली. त्याला प्रवाशांनी प्रतिसादही दिला. त्रस्त प्रवाशांनी एक निवेदन अंबरनाथच्या स्टेशन मास्तरांना दिले. त्यांनी याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करू, अशी ग्वाही दिली आहे. आता यावर रेल्वे प्रशासन काही कार्यवाही करणार की नेहमीप्रमाणे बोळवण करणार, याकडे अंबरनाथमधील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
जलद लोकल धिम्या मार्गावर अनेकदा जलद लोकल दादरच्या पुढे धिम्या मार्गावर वळवतात. परिणमी भायखळा ते सीएसटीएम अर्धा तास घेतात. जलद मार्गावरून लांबपल्ल्याच्या गाड्या काढण्यासाठी हे केले जाते. सर्व लोकलच्या बाबतीत हे घडत नाही. मात्र, ज्या धिम्या मार्गावर वळवितात त्यतील प्रवाशांना फटका बसतो. यामुळे धीम्या लोकलही विलंबाने धावतात. आधीच लोकल कर्जत, कसाराहून उशिरा सुटतात. वेळेत सुटल्या तर कल्याणला थांबवतात म्हणून उशीर होतो. यामुळे कल्याण ते सीएसटीएम डबल फास्ट लोकल दोन तास घेतात अशी टीका प्रवाशांनी केली आहे.
डोंबिवलीकर प्रवाशांची गैरसोयदादरप्रमाणे डोंबिवली हे गर्दीचे ठिकाण आहे. त्या स्थानकात कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल फलाट एकवर न आणता दोनवर आणतात. यामुळे फलाटावार गर्दी होते. या लोकल एकवर आणण्यास दोन्ही बाजूंना फलाट असल्याने गर्दी विभागेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. होम फलाटावर लोकल आली तर सरकता जिन्याचा वापर प्रवाशांना करता योईल. लॉकडाऊनपासून लोकल फलाट एकवर आणणे बंद आहे. वेळोवेळी विनंती करूनही अधिकारी लक्ष देत नाही, अशी टीका प्रवाशांनी केली आहे.