मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उशिराने येणाऱ्या डॉक्टरांमुळे चक्क कंपाउंडरच आलेल्या रूग्णांची तपासणी करून औषधं देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेचे नियंत्रण व देखरेख नसल्याने अन्य काही आरोग्य केंद्रांमध्येही डॉक्टर वेळेत न येणे, औषधांचा तुटवडा आदी अनेक तक्रारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आयडियल पार्क येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेल्या भाविक पाटील या तरूणाला पालिकेच्या भोंगळ कारभाराचा अनुभव आला. मंगळवारी सकाळी ९ वाजता गेलेल्या भाविकला डॉक्टरच विलंबाने आल्याने एक तास थांबावे लागले. ९ ची वेळ असताना १० वाजता डॉक्टर आल्या. त्या आधी डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरच रूग्णांना औषधं देत होता. त्यातही मलेरिया, मधुमेहाचे रूग्ण औषधं नसल्याने परत गेले.सेव्हन इलेव्हन रूग्णालयाच्या इमारतीत महापालिकेच्या मालकीची जागा आधीच अनेक वर्षानंतर विकसकाने पालिकेला हस्तांतरीत केली. त्यासाठी थेट लोकायुक्तांपर्यंत तक्रारी झाल्या व आंदोलने केली गेली. त्यानंतर पालिका व सत्ताधाऱ्यांनी रडतकढत हा दवाखाना सुरू केला. परंतु त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाच दुसरीकडे प्रशासनाचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. या दवाखान्यात डॉक्टर उशिराने येतात अशी तक्रार आधीपासूनच होत होती. विशेष म्हणजे महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यालया लागूनच हे आरोग्य केंद्र आहे.पेणकरपाडा येथील पालिका आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. तर पालिकेच्या एकूणच आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर - कर्मचारी विलंबाने येणे, कंपाउंडरकडून औषधे देणे, आवश्यक औषधे नसणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत. होणाºया गैरसोयींमुळे उपचारासाठी येणारे नागरिक त्रासले आहेत. तर प्रशासनाचे आरोग्य केंद्रावर नियंत्रण व लक्ष नसल्याने एकूणच कारभार रामभरोसे चालला आहे.।डॉक्टर वा कर्मचारी आरोग्य केंद्रांमध्ये विलंबाने येत असल्याच्या तक्रारी आल्या असून सर्वच आरोग्य केंद्रांना लेखी सूचना देणार आहे. कंपाउंडर हा रुग्ण तपासत नाही तर आधी आलेल्या रुग्णांनी औषधं मागितली तर ती दिली जातात. - डॉ. प्रमोद पडवळ,प्रमुख वैद्यकीय अधिकारी>लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना स्वत:ची दालने आणि फायद्याची काळजी बरोबर असते. पण नागरिकांच्या आरोग्याशी काही सोयरसूतक नसते. आरोग्य केंद्रात हे डॉक्टर - कर्मचारी उशिरा येणे, औषधं नसणे, अत्यावश्यक सुविधा - साहित्य न देणे हे नेहमीचेच झाले आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे.- निलेश साहू, स्थानिक नागरिक
लेटलतिफ डॉक्टरांमुळे कंपाउंडर करतात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:55 AM