ठाणे : गाणी, नृत्य, अंकवाचन, पक्षी, प्राणी, झाडे, पाने, फुले, फळांची ओळख, दैनंदिन व्यवहार, कथा सांगणे, आवाज ओळखणे, संभाषण या साऱ्यांचे शिक्षण हसतखेळत, मनोरंजन पद्धतीने तसेच कोणताही कंटाळा न करता बालनगरीत चिमुकल्यांनी घेतले.शिक्षणाची शैक्षणिक जत्राच या बालनगरीत पाहायला मिळाली. एकाच छताखाली शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक एकत्र आले होते. या बालनगरीत ३ ते ६ वयोगटांतील मुलांच्या विकासक्षेत्रांच्या विविध दालनांची सफर घडली.सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे शनिवार व रविवार दोन दिवस बालनगरीचे आयोजन केले. शनिवारी त्याचे उद्घाटन एनसीईआरटीच्या सहायक प्रोफेसर डॉ. रोमिला सोनी यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे व इतर उपस्थित होते. हसतखेळत बालशिक्षणाची प्रात्यक्षिके या बालनगरीतील विविध दालनांमधून बघायला मिळाली. या बालनगरीत एकूण १२ दालने आहेत. त्यात भाषाविकास - श्रवण व संभाषण, वाचनपूर्व ते वाचन, लेखनपूर्व ते लेखन, परिसर, बौद्धिक विकास - गणित, ज्ञानेंद्रिय दालन, जीवनव्यवहार, गाणी, नृत्य, पपेट, मुक्तखेळ, सामाजिक व भावनिक विकास, कलाविकास, स्थूलस्नायू विकास कृती अशी त्याची आखणी करण्यात आली. मुले १०-१० च्या गटाने या दालनातून फिरत होते व तेथील शिक्षिका त्यांचे त्या विकासक्षेत्राचे पाठ घेत होत्या.अशा प्रकारच्या शिक्षणातून मुलांची निरीक्षणशक्ती वाढते, त्यांना पर्यायी शब्द समजतात, त्यांचा शब्दसंग्रह वाढतो, परिसर समजतो, बौद्धिक विकास होतो, असे मत शिक्षकांनी नोंदविले. श्रवण संभाषणात तर मुलांनी एक शब्द ओळखल्यावर त्यावरून माहिती सांगितली. विविध खेळांच्या माध्यमांतून मुलांनी वाचन केले. गणितीच्या दालनात तर खेळांद्वारे गणित शिकले, पपेट शोमध्ये मुलांनी आवडीने भाग घेतला. जीवनव्यवहार दालनात तर संपूर्ण दैनंदिन जीवन मुलांनी अनुभवले. झाडांना पाणी घालण्यापासून पीठ मळणे, धान्य भरणे-ओतणे यासारख्या विविध कृती केल्या. यात मुलांना ताक घुसळणे, जात्यावर दळणे हे नवीन शिकायला मिळाले. डान्स या दालनात तर मुले उत्साहाने नाचताना दिसली. तर, मुक्त खेळात कोणताही खेळ खेळण्याची मुभा मुलांना होती.तीन ते सहा वयोगटांतील मुलांच्या शिक्षणाचा उल्लेख नेहमीच ‘बालशिक्षण’ असा केला जातो. ‘हसतखेळत शिक्षण’ हा या बालशिक्षणाचा गाभा आहे. हे शिक्षण ‘मूलकेंद्री’ असले पाहिजे. विविध शैक्षणिक कृती अनुभवांनी सज्ज असली पाहिजे. या वयोगटांतील मुलांना अभ्यास किंवा त्याअनुषंगाने येणाºया लेखन व वाचनाच्या दडपणाखाली न आणता सहज त्या वाटेवर सोडले पाहिजे. यासाठी या वयोगटांतील पालकांपुढे व या क्षेत्रात काम करणाऱ्यांपुढे मांडण्यास सरस्वती मंदिर ट्रस्टने या बालनगरीचे आयोजन केले आहे.- सुरेंद्र दिघेबालशिक्षण हा विषय महत्त्वाचा आहे. त्यासाठी नियमांचे पालन करून अध्यापन करणे गरजेचे आहे. यंदाच्या बालनगरीत ही बाब दिसली. मात्र, शाळांमध्ये वर्षभर अशाच पद्धतीने शिक्षण होणे गरजेचे आहे. ज्या शिक्षणात विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात, त्याच पद्धतीतील शिक्षणाची गरज आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण पुढील वाटचालीचा पाया असल्याने तो मजबूत राहावा, यासाठी शिक्षक व शिक्षणसंस्था यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांचे वय आणि आकलनशक्ती यांचा विचार करत शिक्षण व्हावे. - डॉ. रोमिला सोनी
चिमुकल्यांनी घेतले हसतखेळत शिक्षण; बालनगरीत शिक्षक, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 11:58 PM