उरण : मोरा-भाऊचा धक्का दरम्यान ४३ प्रवासी घेऊन जाणाऱ्या लाँचच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने खवळलेल्या समुद्रात बंद पडली, त्यामुळे लाँचमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांमध्ये भीतीने गाळण उडाली. खवळलेल्या समुद्रात तासभर जीवावर बेतलेल्या प्रवाशांचा देवांचा धावा सुरू असताना अन्य लाँचची वेळीच मदत मिळाल्याने प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. भाऊचा धक्का जेट्टीवर उतरविल्यानंतर तासाभराच्या जीवघेण्या प्रवासातून सुटलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.मोरा-भाऊचा धक्का दरम्यान सागरी मार्गावरून एम.एल. काशिमी लाँच ४३ प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली होती. सकाळी ७.३० वाजता सुटलेल्या लाँचने निम्मे सागरी अंतर पार केल्यानंतर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाला. बिघाड झालेली लाँच खवळलेल्या समुद्रात भरकटली. लाटांच्या तडाख्यात हेलकाव्या खाणाºया लाँचमुळे प्रवाशांचीही चांगलीच गाळण उडाली. दरम्यान, लाँच कर्मचाºयांनी बंद पडलेल्या लाँचची माहिती पोर्ट आणि संस्थेच्या कार्यालयात दिली. त्याच वेळी मागून प्रवाशांना घेऊन निघालेल्या सावित्री प्रवासी बोटीची प्रवाशांना मदत मिळाली. अखेर तासाभराच्या कसरतीने ४३ प्रवाशांना सुखरूपपणे भाऊचा धक्का बंदरात उतरविल्याची माहिती मोरा बंदर विभाग निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.
मोरा बंदरातून ४३ प्रवाशांना घेऊन निघालेली लाँच भरकटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:49 PM