कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात पुन्हा सोडियम हायपोक्लोराइड व जंतुनाशक फवारणीची विशेष मोहीम राबविली जात आहे. शनिवारी सहा प्रभागांमध्ये, तर रविवारी सकाळ आणि दुपार या दोन सत्रांत ही मोहीम पार पडली. दिवसा रहदारीचा अडथळा असल्याने रात्री १० नंतर अग्निशमन दलाच्या वाहनांद्वारे सोडियम क्लोराइडची विशेष फवारणी दोन्ही दिवस करण्यात आली.
कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. आजघडीला ही संख्या ६२ हजारांच्या वर पोहोचली आहे. त्यात ६१ हजारांहून कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. उपाययोजनांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आणि रविवारी महापालिका क्षेत्रात सोडियम हायपोक्लोराइड व जंतुनाशक फवारणीची, तसेच धुरावणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी महापालिकेच्या अ, ब आणि क प्रभाग क्षेत्र परिसरात सकाळी ६.३० ते दुपारी १.३० यावेळेत ही मोहीम राबविली.
या ठिकाणी राबविली मोहीम
दुपारच्या सत्रात २ ते रात्री १० या वेळेत डोंबिवलीमधील फ, ग आणि ह या प्रभाग क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली, तर रविवारी सकाळी ६.३० ते दुपारी १.३० या वेळेत कल्याणमधील ड व जे प्रभाग क्षेत्रात आणि दुपारी २ ते रात्री १० या वेळेत आय व ई प्रभाग क्षेत्रात ही फवारणी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या मोहिमेत ११ मल्टिजेट वाहने, ४ जीप माउंटेड फॉग मशीन, तसेच ३१ हॅण्ड फॉग मशीनचा वापर करण्यात आला.