ठाणे - बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या स्तनाचे व गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करून प्राथमिक स्तरावील कर्करोगाचे निदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण मंगळवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत झाले. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्र म ठरला आहे. यावेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपा गटनेते नारायण पवार, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती नम्रता घरत, नगसेविका परिषा सरनाईक, नगरसेवक मिलिंद पाटणकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे आदी उपस्थित होते. जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, स्तनाच्या कॅन्सरच्या प्राथमिक लक्षणांबाबत अपुरी माहिती, वैद्यकीय चाचण्यांबाबतच्या जागृतीचा अभाव तसेच तपासणीसाठी आवश्यक सोयीसुविधांची अनुउपलब्धता यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाची योग्य तपासणी करणे शक्य नव्हते. या पाशर््वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने महिलांना कर्करोगाची तपासणी तात्काळ करून योग्य उपचार घेण्यात यावा म्हणून ही मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला तर पूर्ण बरा होऊ शकतो. लवकर निदान झाल्यास साध्यउपचारांनीही हा आजार बरा करता येतो म्हणुन सर्व विवाहित स्त्रियांनी ठाणे महापलिकेच्या या मोबाईल व्हॅनमधील अद्ययावत यंत्रणेद्वारे तपासणी करून घेण्याचे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.नियमित तपासणी, जागरूकता, योग्य उपचार असतील तर गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो म्हणून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये या मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या व्हॅनची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून संपूर्ण तपासणी मोफत असणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. या तपासणीचा प्रत्येक सोसायटीमधील महिलांना लाभ घेता येणार आहे.४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वयाच्या ३५ ते ४५ वर्षात आढळतात. यामध्ये काही अंशी अनुवांशिकता आढळते. आपल्या शरीरातील पेशींची जेंव्हा अनिर्बंध वाढ होऊ लागते तेंव्हा कर्करोगाची लागण होते. त्याच प्रमाणे जेंव्हा स्तनातील पेशींची अनिर्बंध वाढ होते तेंव्हा स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. स्तनाची तपासणी करून, गाठ असेल तर कुठे व कशी आहे? गाठ वाढते आहे का? हे या मॅमोग्राफी मशीनद्वारे महिलांना तपासणी करता येणार आहे.चौकट -या मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनमध्ये एक क्ष-किरण तंत्रण व एक स्टाफ नर्स असणार असून मॅमोग्राफी मशीनद्वारे महिलांची तपासणी तसेच नमुने घेवून ते पुढील तपासणीसाठी शिवाजी हॉस्पिटल व वाडिया हॉस्पिटलला पाठवले जाणार आहेत. या तपासणी नंतर महिलांना तपासणीतील निष्कर्ष मोबाईल एसएमएस तसेच व्हॉटसपवर पाठवली जाणार आहे. या तपासणी दरम्यान कर्करोग ग्रस्त महिलांना प्राथमिक उपचार महापालिकेच्या शिवाजी हॉस्पिटलला करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या स्तरावरील कर्करोगाच्या उपचारासाठी टाटा हॉस्पीटल येथे पाठवण्यात येणार आहे. परंतु तत्पूर्वी काही वित्त सहाय्य संबधींतांना करता येऊ शकते का? याचा विचार महापालिका स्तरावर सुरु असून त्यानुसार पुढील एक ते दोन महिन्यात तसा प्रस्ताव महासभेत आणला जाईल असेही यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले.
भारतातील पहिल्या मोबाइल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण, प्रत्येक सोसायटीमधील महिलांची होणार मोफत कर्करोगाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 4:28 PM
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान होण्यासाठी अत्याधुनिक अशा मोबाइल मॅमोग्राफी व्हॅनचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यामध्ये महिलांची मोफत तपासणी करण्यात येणार असून दिवसाला ३० महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
ठळक मुद्देप्रत्येक प्रभागात फिरविली जाणार व्हॅनमोफत सुविधा होणार उपलब्ध