डोंबिवली- जीवनात गुरूंचे महत्व आणि नामाची शक्ती अनन्यसाधारण असून त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. अबलवृद्धांचे आदराचे स्थान गुरू असते, लहानपणापासूनच गुरू आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवतात. गुरू शिष्य परंपरेचा मोठा वारसा आपल्या धर्माला लाभलेला आहे. गुरू शिष्यांच्या नात्याची अनेक उदाहरण आहेत, आचार्य म्हणजे कोण तर जो बोलतो तसे आचरण करतो तो आचार्य. गुरू आणि सद्गुरू यातही फरक आहे. माझ्यापेक्षा कोणीतरी आहे ती सद्ग ची भावना जपत जो मार्गदर्शन करतो तो सद्गुरू म्हणून ओळखावा असे मत प्रख्यात व्याख्यात्या , प्रवचनकार धनश्री लेले यांनी व्यक्त केले.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
त्यावेळी श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरातील ध्यानमंदिरात सम्पन्न झालेल्या उपक्रमात त्या बोलत होत्या. डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबा पटवारी, डॉ. वरूण पाटील, डॉ.अजित ओक, डॉ. अनघा हेरूर, मंडळाचे अध्यक्ष नित्यानंद घाटे, अध्यक्षा माधुरी घाटे, सुहास पेंडसे, यांच्यासह श्रीराम व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच निमीत्ताने मंडळाच्या संस्थापिका सुषमा लिमये यांच्या प्रेरणेने विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. डॉ.पाटील, पटवारी, ओक यांच्यासह घाटे दाम्पत्याने त्याचे लोकार्पण केले. मंदिराच्या जिर्णोद्गाराचे काम जोमाने सुरू असून असंख्य भक्त गणामुळे ते शक्य होत असल्याची भावना घाटे यांनी व्यक्त केली. याच निमीत्ताने मंदिराच्या 106 किलो वजनाच्या घंटेचे पूजन करण्यात आले. आपल्या पूजा-आर्चेत घंटानाद महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पूजन तेवढेच आवश्यक असून नकारात्म भावना त्यातून काढल्या जातात, सकारात्मक ऊर्जा त्यामुळे उत्पन्न होते. त्यासाठी तो नाद खूप महत्त्वाचा असतो. म्हणून विविध देवळांमध्ये विशिष्ट वेळाने घंटानाद करला जातो. सकारात्मक असणे आणि त्यामुळे चांगली कार्य होणे ही काळाची गरज आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा हा सद्गुरू कै. अण्णानी जपलेला मूलमंत्र मंडळाचे असंख्य सेवेकरी जोपासत आहेत हे महत्वाचे आहे. सेवेकरी वृंदामुळेच मंडळाची शिस्त, ख्याती सर्वत्र पसरली आहे. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील मंडळाच्या शुभ चितकांमुळेच मंडळाची प्रगती होत असून विविध टप्पे आपण गाठत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सद्गुरू महिमा,वारसा या ठिकाणी जोपासला जातो, तो पुढे नेला जात आहे हे देखील मंडळाचे वैशिष्ठ आहे. मंडळाचे श्रीराम मंदिर लवकरच पूर्ण होणार असून हॉस्पिटल उभे करण्याच्या दृष्टीने मंडळाची वाटचाल सुरू होत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मंडळाच्या उपक्रमांना स्वामी भक्तांनी नेहमीच सहकार्य केले असून आगामी काळातही ते प्रेम, आपुलकी कायम ठेवावी असे आवाहन यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले.