ठाणे : तुमच्या नावाने आलेल्या मोबाईलमधून इतरांना अश्लील मेसेज जात असून तुमच्या बँक खात्यावर पैशांची मोठी उलाढाल झाली आहे. यातून सुटका करुन घ्यायची असल्यास काही पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी करून सायबर भामटयाने ठाण्याच्या कोलशेत परिसरातील ५४ वर्षीय महिलेची तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली.
यातील तक्रारदार नोकरदार महिला कोलशेत परिसरात वास्तव्याला आहे. तिला २१ ऑगस्ट २०२४ राेजी दूरध्वनी आला होता. दूरध्वनीवरून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या नावाने असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन अश्लील आणि बेकायदा मेसेज जात असल्याचे तिला सांगितले. तसेच तुमच्या बॅक खात्यांवरून मनी लॉन्ड्रींग झाल्याचीही बतावणी केली. यातून सुटण्यासाठी महिलेकडून सात लाखांची रक्कम दोन वेगवेगळया बँक खात्यावर पाठविण्यास तिला भाग पाडले.
प्रत्यक्षात या महिलेने चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने १२ ऑगस्ट २०२४ रोजी अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), २०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक हे करीत आहेत.