कायदा धाब्यावर बसवणे विकृतीच  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 03:00 AM2018-09-23T03:00:22+5:302018-09-23T03:00:57+5:30

सध्या समाजात हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत असून त्याची जी वेगवेगळी कारणे आहेत, त्यामध्ये ध्वनिप्रदूषण हेही महत्त्वाचे कारण असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी केली.

Law on the hoax | कायदा धाब्यावर बसवणे विकृतीच  

कायदा धाब्यावर बसवणे विकृतीच  

Next

- डॉ. महेश बेडेकर

सध्या समाजात हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत असून त्याची जी वेगवेगळी कारणे आहेत, त्यामध्ये ध्वनिप्रदूषण हेही महत्त्वाचे कारण असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी केली. रुग्ण, वृद्ध, लहान मुले, स्त्रिया यांना डीजे किंवा ढोलताशांच्या दणदणाटाचा त्रास होतो. मिरवणुकीत भजन, भक्तिगीते वाजवायची असतील, तर डीजेची गरज नाही. सैराट चित्रपटातील गाणी चांगली आहेत, पण गणपतीसमोर ती वाजवणे योग्य नाही. मात्र, कायदा धाब्यावर बसवून आम्ही आम्हाला वाटेल तेच करणार ही प्रवृत्ती बळावत आहे. ही विकृती ध्वनिप्रदूषणापेक्षा घातक आहे.


डीजेला विरोध असण्याचा प्रश्नच नाही. सणांचे बदलते स्वरूप यावर पिटीशन दाखल आहे. त्या पिटीशनमध्ये मी डीजेचे नावदेखील घेतलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांवर ध्वनिप्रदूषणाचे नियम दिलेले आहेत. सध्या हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत असून हृदयविकाराच्या वाढीचे एक महत्त्वाचे कारण ध्वनिप्रदूषण असल्याचे अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. यात मुख्यत्वे विकसित शहरांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. ध्वनिप्रदूषणाचे साइड इफेक्ट सर्वांनाच माहीत आहेत. मोठ्यामोठ्याने वाजणाऱ्या ढोलताशांमुळे हृदय धडधडते व आवाजाचा त्रास होतो, हे कोणी नाकारू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटना जगभरात अभ्यास करून निष्कर्ष जाहीर करते. त्या निष्कर्षावर आधारित कोर्टाने निर्णय दिला आहे. हे सर्व निष्कर्ष सार्वजनिक ठिकाणी उत्सवाच्या काळात झालेल्या आवाजावरून नोंदलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणे, गल्लोगल्ली असलेली हॉस्पिटल्स, आयसीयू वॉर्डमधील पेशंट, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया यांच्यावर होणारे परिणाम तपासून हे निष्कर्ष काढले आहेत. ज्यावेळी डीजे लावले जातात, जोरजोरात ढोलताशे वाजवले जातात, तेव्हा शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेचा त्रास जे नाचतात, त्यांनाही होतो आणि ज्यांना ते ऐकायचे नाही, त्यांनाही होतो. रुग्णांना स्वच्छता आणि शांतता लागते. गणपती ही बुद्धीची देवता आहे, हा आपला पारंपरिक सण आहे. कोणत्याही धर्मात डीजे लावून सण साजरे करा, असे म्हटले नाही. डीजेचा त्रास होतो हा एक भाग आहेच, पण डीजेवर गणपतीसमोर ज्या पद्धतीची हिणकस गाणी लावली जातात, त्यावर आमचा आक्षेप आहे. शांतपणे भजन, आरती म्हणायची असेल तर डीजेची गरजच लागणार नाही. पण आपण ज्या पद्धतीने सण साजरा करतोय, त्यावर आक्षेप नक्की आहे. सण साजरे करताना लोकांना त्रास द्या, असे कोणत्याही धर्मात म्हटलेले नाही. आपल्या घटनेत प्रत्येकाला सण त्याच्या पद्धतीने साजरा करण्याची मुभा दिली आहे, तसेच, घटनेने शांतपणे जगण्याचीही मुभा दिली आहे. गणपतीसमोर ती गाणी चालणार नाही, ते मला पटत नाही आणि हाच विचार लोकांसमोर मांडायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्याही सणांच्या, मंडळांच्या, कोणत्याही राजकीय नेत्यांच्या विरोधात आम्ही नाही. परंतु, लोकांनी याचा विचार करावा. डीजेची गरज बॉलिवूडच्या गाण्यांसाठी आहे, भजनांसाठी नाही. याचा लोकांनी सकारात्मक पद्धतीने विचार करावा. कोर्टात जाण्याची वेळ आली, कारण दुर्दैवाने समाजात चुकीचे जे सुरू आहे ते करू नका, असे सांगणारे नेते, धर्मगुरू, सेलिब्रेटी राहिलेले नाहीत. सगळ्या राजकीय पक्षांनी हे सण हायजॅक केले आहेत, त्याच्याविरोधतही आम्ही नाही. फक्त आमच्या पिटीशनमध्ये रस्ते अडवू नका. रस्ते रहदारीसाठी, चालण्यासाठी आहेत. रस्ते मोठे नसल्याने ते अडवून मोठे मंडप उभारले तर, त्याचा लोकांनाच त्रास होतो. एवढेच म्हटले आहे. जसे सण साजरे करण्याचा तुम्हाला हक्क दिला, तसा मलाही रस्त्यावरून चालण्याचा हक्क दिला आहे. कोणत्याही कोर्टाचे निर्णय हे राज्यघटनेवर आधारित असतात. जेव्हा राजकीय पक्ष कोर्टाच्या निर्णयाविरोधात कृती करतात, तेव्हा वाईट वाटते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. लोकांची मानसिकता बदलत असून कायदा धाब्यावर बसवण्याकडे कल वाढत असल्याने निर्नायकी अवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे. ही बदललेली मानसिकता ध्वनिप्रदूषणापेक्षा घातक आहे. निर्णय पटला नाही तर कोर्टात जावे. पण आम्ही डीजे वाजवणारच, ही भूमिका सपशेल चुकीची आहे. डीजेचा वापर सार्वजनिक ठिकाणी करणे हे चुकीचे आहे. आज शहरात ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढले आहे. परंतु धर्म, परंपरेच्या नावाखाली डीजे, ढोलताशांच्या आवाजाची त्यात भर घालण्यावर आमचा आक्षेप आहे. पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जेथे हॉस्पिटल आहेत, तेथे तरी मोठमोठ्याने डीजे, ढोलताशे वाजवू नका, हे पोलिसांनी लोकांना सांगितले पाहिजे. पोलिसांनी सांगितले तर लोक ऐकतील. मात्र, हॉस्पिटलसमोर डीजे वाजवू नका, असे सांगूनही लोक ऐकत नसतील तर इतक्या संवेदनाहीन लोकांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. राजकीय पक्षांनी या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.
लोकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत जागृती होत आहे, पण गावांतील पूर्वीची शांतता संपुष्टात आली आहे. गणपती उत्सवातून प्रबोधन झाले असते, तर नीतिमत्ता ढासळली नसती. विनयभंग, बलात्कारांसारखे गुन्हे वाढत आहेत, भ्रष्टाचार बोकाळला आहे. आमची भूमिका लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सैराटचे गाणे खूप चांगले पण ते गणपतीसमोर चांगले नाही. ही गाणी ऐकताना मनात वेगळे भाव असतात, ती गणपतीसमोर चालणार नाही. राजकारणी म्हणत असतील तुम्ही वाट्टेल ते करा, आम्ही पाठीशी आहोत तर हे चित्र चांगले नाही. आमची भूमिका समाजाला पटू लागली आहे. एक दिवस संपूर्ण समाज डीजे वाजवून अश्लील गाण्यांवर अचकटविचकट नाचण्याबाबत नापसंती व्यक्त करतील, तेव्हा राजकारण्यांना आपली चूक लक्षात येईल.
(लेखक सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आहेत)
- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे

Web Title: Law on the hoax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.