ठाणे : उसनवारीने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तक्रारदाराला जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भागवत यांनी वकील प्रमोद भोईर यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अॅट्रॉसिटी) कायद्यान्वये सहा महिने कारावासी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरण्यात आल्याची माहिती सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी गुरुवारी दिली.
हा प्रकार वाडा येथे २०१५ मध्ये घडला होता. तक्रारदार रामचंद्र जाधव आणि आरोपी भोईर हे दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. भोईर यांनी जाधव यांना ११ जुलै २०१५ रोजी फोन करून आता एक लाखाची मदत करा, अशी विनंती केली होती. मात्र, त्यांनी त्यांच्या परिचयातील इतरांकडून पैसे घेऊन एक लाख रुपये जमा करुन त्यांना एका महिलेमार्फत पैसे दिले. त्यावेळी लवकरच पैसे परत करतो, भोईर यांनी सांगितले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे जाधव यांनी त्यांना फोन केल्यावर भोईर यांनी फोन घेतला नाही.
त्यानंतर २९ जुलै रोजी मित्राच्या मोबाईलवरून जाधव यांनी फोन करुन भोईर यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी पैशांची मागणी केल्याच्या रागातून भोईर यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झाला होता. या खटल्यात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि सहा साक्षीदारांची साक्ष ग्राहय मानून आरोपीला अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दोषी सहा महिने कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली.