- अजित मांडके
ठाणे : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणीत करण्यात येत असला तरी थरांवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षिततेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या काही वर्षांत ठाणे शहरातच अनेक गोविंदा जायबंदी झाले आहेत. सुदैवाने गेल्या काही वर्षात जीवितहानी झालेली नाही. नियमांचा अडसर ठाण्यात येत असला तरी मागील वर्षी हे नियम पायदळी तुडवून दोन ठिकाणी उंच थरांच्या हंड्या लागल्या होत्या. यंदा या उत्सवावर कोल्हापूर, सांगली येथील पुराचे सावट असले, तरी थरांची उंची लागणार आहे. तथापि, दुर्घटना टाळण्यासाठी दहीहंडी करा, परंतु नियम पाळा, असे सांगण्याची वेळ आली आहे. दहीहंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरूणाईत दिसून येतो. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात दहीहंडीची क्रेझ जास्तच दिसून आली आहे. शहरात लहानमोठी सुमारे १५० हून अधिक मंडळे उत्साहात ती साजरी करत असतात. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा यानिमित्ताने असते. ठाण्यामध्येखास असे गोविंंदा पथक किंवा गोपिका पथक नसले तरी, उंच थरांची हंडी फोडण्यासाठी मुंबईची पथके ही ठाण्यात सकाळपासून रात्रीपर्यंत तळ ठोकून असतात. शिवाय स्थानिकांसाठीदेखील वेगळी हंडी ठेवण्यात येत असते. परंतु, ठाण्यात बक्षिसांची रक्कमही लाखांची असते. त्यामुळे दरवर्षी ठाण्यात जीवघेणी स्पर्धा होताना दिसते. मागील काही वर्षांत यासंदर्भात सुरक्षितता पाळली जावी, कोणतीही हानी होऊ नये, यासाठी नियम बनवण्यात आले आहेत. मात्र, ते नियमही पायदळी तुडवण्याचे काम आयोजकांकडून होताना दिसते. परंतु, ठाण्यातील काही गोंिवंदा पथके मात्र या जीवघेण्या स्पर्धेपासून लांब असल्याचे दिसत आहे. परंतु, तरीही यामुळे दरवर्षी १५ ते २० गोविंदा हे जखमी होताना दिसत आहेत.ठाण्याची दहीहंडी; मुंबईचे गोविंदा पथकठाण्यातील काही भागांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने दहीहंडी होते. मात्र, नव्याने विकसित झालेल्या हिरानंदानी मेडोज, जुन्या ठाण्यातील भगवती विद्यालय परिसर, जांभळीनाका, कोर्टनाका, रघुनाथनगर आदी भागांमध्ये दहीहंडीला कॉर्पोरेट लूक असतो. त्यामुळे या भागात स्पर्धा वाढते. ठाण्यातील ओपन हाउस येथे काही वर्षांपूर्वी स्पेनचे एक खास पथकही दहीदंडीसाठी दाखल झाले होते. तर, उंच थर लावल्याने मुंबईतील गोविंदा पथकाचे नाव हे सातासमुद्रापार गेले होते. परंतु, आता नियमांची बंधणे आल्याने उंच थरांची स्पर्धा काही ठिकाणी कमी झाली असली तरी नव्या ठिकाणी ती वाढताना दिसत आहे. त्यामुळे उंच थर लावण्यासाठी ठाण्यापाठोपाठ मुंबईतील नामांकित गोविंदा पथके ठाण्यात दाखल झालेली असतात.मागील २३ वर्षे आम्ही हा उत्सव साजरा करीत आहोत. ठाण्यात पहिले सात थर लावणारे गोविंदा पथक म्हणून आमची ओळख आहे. आता या उत्सवाला स्पर्धेची ओळख मिळाल्याने त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतो.- राकेश यादव,ठाण्याचा राजा गोविंदा पथकदहीहंडीसाठी सुरक्षिततेची नियमावली आहे. त्याचे पालन सर्व मंडळांनी करणे आवश्यक आहे. लहान मुलांना सर्वात वरील थरावर नेणे टाळावे, नियमांचे उल्लघंन केल्यास संबंधित मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.- विवेक फणसळकर,पोलीस आयुक्त