नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:14 AM2018-10-28T04:14:29+5:302018-10-28T04:15:07+5:30

नितीन गडकरींच्या घोषणेला विरोध; अगोदर ठाणेकरांची तहान भागवा, मग नाशिक-नगरचे बोला

Leaders demonstrated the 'water' | नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

नेत्यांनी दाखवले महाआघाडीचे ‘पाणी’

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहून समुद्राला मिळणारे पाणी धरण बांधून अडवून नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांना देण्याची घोषणा करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध करून आपले एकजुटीचे पाणी दाखवले आहे. अगोदर तहानलेल्या ठाणे जिल्ह्याला त्या धरणांतून पाणी द्या. मग, पाणी उरलेच तर नाशिक-नगर जिल्ह्यांना द्या, अशी रोखठोक भूमिका नेत्यांनी घेतली आहे.
ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व असले, तरी सध्या भाजपासोबत सेनेची सतत खडाखडी सुरू असते. घनकचरा व्यवस्थापन, राज्य सरकारचा निधी, फेरीवाले, नागरी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवरून शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली किंवा मीरा-भार्इंदर या महापालिकांत दिसते. उल्हासनगरात तर सत्तेकरिता शिवसेनेने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. ऐनवेळी शिवसेनेने माघार घेतली. खुद्द ठाणे शहरात भाजपाचे नगरसेवक हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक झालेले दिसतात. मात्र, ठाणे
जिल्ह्यातील पाण्याच्या मुद्द्यावरून पक्षांतर्गत हेवेदावे विसरून सारे एकत्र आले. दरम्यान, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे शहरांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा संपूर्ण बंद असतो. जिल्ह्यालाही पाण्याची अतिशय गरज आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विकासाची कामे झाल्याने लोकसंख्या वाढत आहे. असे असताना त्यांच्यासाठी शासनाने नव्याने पाणीयोजना राबवली पाहिजे. यापूर्वी
मुंबई व इतर महापालिका क्षेत्रांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे, म्हणून शहापूर व भिवंडी तालुक्यांत धरणे बांधली. परंतु, बाधित गावांना व तालुक्यातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना अनेकवेळा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तत्कालीन शासनाने निश्चित धोरण न आखल्याने ही स्थिती निर्माण झाली. शहापूरमध्ये धरण बांधले जात असेल, तर तेथील लोकांना त्याचे पाणी मिळालेच पाहिजे. जिल्ह्यात कोठेही धरण बांधले जाणार असेल, तर स्थानिकांना पाणी मिळाले पाहिजे.
- कपिल पाटील, खासदार, भाजपा

ठाणे जिल्हा हा पाण्याच्या दृष्टीने अतृप्त आहे. ही गोष्ट खरी आहे की, नाशिक आणि ठाण्याने मुंबई नव्हे तर महाराष्ट्राची तहान भागवली आहे. परंतु, ठाणे जिल्हा त्यादृष्टीने पाण्यासाठी नेहमीच उपाशी राहिलेला आहे. आता पावसाळा संपत नाही, तोच पाणीटंचाईची स्थिती
निर्माण झाली आहे. मागील २५ वर्षे धरण बांधणार म्हणून आश्वासन दिले जात आहे. परंतु, ते काही बांधले गेले नाही. २००३ साली जे धरण मी आणले, ते धरण शिवसेनेच्या टक्केवारीमुळे रद्द झाले. आजही ठाणे शहराला भीक मागून पाणी आणावे लागत आहे. करोडो रुपयांच्या योजना जाहीर होत आहेत. परंतु, पाण्यासाठी कोणतीच योजना आखली जात नाही. त्यामुळे गडकरी आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, आधी ठाणे जिल्ह्याची तहान भागवा, मग हव्या त्या योजना आणा.
- जितेंद्र आव्हाड,
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मागील ६० वर्षे ठाणे जिल्हा हा मुंबईची तहान भागवत आहे. ठाण्यासाठी धरण असावे, म्हणून शाई आणि काळू धरणांसाठी प्रयत्न झाले. परंतु, तेथील रहिवाशांनी विरोध केल्याने धरण रखडलेले आहे. नगर आणि नाशिकला पाणी देण्यास काही हरकत नाही. परंतु, ते करत
असताना ठाणे जिल्ह्याची तहान आधी भागवणे गरजेचे आहे.
- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

Web Title: Leaders demonstrated the 'water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.